चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला:आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला, राज-उद्धव युतीवरही दिली प्रतिक्रिया

चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला:आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला, राज-उद्धव युतीवरही दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे या गावी आहेत. दरे गावी जाऊन ते सध्या शेती करताना दिसून आले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. चंद्र कुठे आहे, ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटते त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढले आहे, मात्र चंद्र कुठे आहे ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसून येतात. दरम्यान, सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र याण्याची चर्चा रंगली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, साद प्रतिसाद आहे पण वाद नाही. दोन पक्षप्रमुख बोलल्यानंतर त्यावर आता कार्यकर्त्यांनी बोलायची गरज नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी रस्ते आणि नालेसफाईवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नालेसफाई झालेली नाही, पण तिजोरीची मात्र सफाई झाली आहे. पोईसर नदीचा फोटो समोर आला आहे. मिठी नदी सुद्धा अस्वच्छ आहे, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या संदर्भात बैठक घेतली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात तापमानाप्रमाणेच बदल होताना दिसत आहे. एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू आता युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर अनेकांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे. कामाचे बोला, असे म्हणत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिल्याचे पाहायला मिळाले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment