बदलत्या वातावरणात सर्दी, खोकल्यामुळे आबालवृद्ध त्रस्त:वातावरण बदलाचा परिणाम जिल्हा शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्ण वाढले‎

बदलत्या वातावरणात सर्दी, खोकल्यामुळे आबालवृद्ध त्रस्त:वातावरण बदलाचा परिणाम जिल्हा शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्ण वाढले‎

उन्हाळा सुरु झाला असूनही मागची आठवड्यात तीन चार दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले होते. तसेच सध्या दिवसा प्रचंड तापमान आणि रात्री थंडीचे वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आबालवृद्धांच्या प्रकृतीवर होत आहे. सर्दी, ताप, खोकला आणि अतिसारासारख्या आजारांमुळे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. एरवी दररोज शंभराहून कमी रुग्ण तपासणीसाठी येत असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सव्वाशे ते दीडशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. सध्याच्या बदलत्या वातावरणात विषाणूजन्य साथीचे आजार डोके वर काढतात. ते रुग्णांच्या थेट श्वसन आणि पोटातील आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे सर्दी पडसे, खोकला, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, मळमळ असा त्रास रुग्णांना जाणवू लागला आहे. यात सर्वच वयोगटातील रुग्ण आहेत. खासगी दवाखान्यातही रोजचा ओपीडीचा आकडा शंभराच्या पुढे गेला आहे. लहान मुलांच्या दवाखान्यात तर रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. मात्र प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लहान बालकांना याचा जास्त त्रास होत असल्याने मुलांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुले आजारी पडल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. बाहेरचे खाणे टाळा : बाहेरचे खाणे, विशेषतः हॉटेल्स, पाणीपुरी किंवा फूड स्टॉल्सवर तयार केलेले पदार्थ स्वच्छतेच्या बाबतीत अनिश्चित असू शकतात, म्हणून बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. उन्हात फिरणे टाळा : दिवसभरातील उष्णतेमुळे मुलांचे शरीर जलद डिहायड्रेट होऊ शकते. त्यांना सर्दी, ताप किंवा डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे मुलांना उन्हात फिरायला पाठवू नये. संतुलित आहार : मुलांचा आहार पोषणतत्त्वांनी समृद्ध असावा. प्रोटीन, व्हिटॅमिन सी, आयरन, आणि फायबर असलेले पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने उष्माघातासारख्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी, मळमळ, उलटी, थकवा येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे,डीहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणेही उष्माघाताची लक्षणे असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे. विषम वातावरण ठरतेय त्रासदायक ^सध्याचे बदलेले विषम वातावरण नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरत आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करावेत. कारण, शहरातील विषम वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वातावरण बदलामध्ये मुलांसह सर्वांनीच बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे. स्वच्छ, शुद्ध आणि भरपूर पाणी प्यावे. – डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment