चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून:रील्स बनवणारे, यूट्यूबर्सना प्रवेश नाहीच; व्हीआयपींसाठीची सशुल्क दर्शन सुविधाही बंद

उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेत यूट्यूबर्स आणि व्हिडिओ रील बनवणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याची तयारी केली जात आहे. केदारनाथ-बद्रीनाथच्या पंडा समाजाने निर्णय घेतला की, या वेळी मंदिर परिसरात अशा लोकांना येऊ दिले जाणार नाही. जर कोणी असे करताना आढळले तर त्याला दर्शन घेऊ न देता परत पाठवले जाईल. प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. केदारनाथ सभेचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी सांगितले की, मागील वर्षी रील बनवणाऱ्यांमुळे खूप अव्यवस्था झाली होती. केदारनाथ धामात ढोल नगाऱ्यांचा आवाज फक्त रील बनवण्यासाठी केला गेला होता. या आवाजामुळे शिवालिक पर्वतांमध्ये सुरुवातीच्या १० ते १२ दिवस गोंगाटच होत होता. त्यामुळे यंदा कॅमेरा ऑनही करू दिला जाणार नाही. १० किमीवर १० ठिकाणी विश्रामस्थळांची व्यवस्था चारधाम यात्रेदरम्यान खराब हवामान व विपरीत परिस्थितीत यात्रेकरूंना थांबवण्यासाठी १० ठिकाणी विश्रामस्थळे तयार केली जात आहेत. ही स्थळे हरिद्वार, ऋषिकेश, ब्यासी, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, हरबटपूर, विकासनगर, बडकोट, भटवाडी येथे असतील. येथे पाणी, शौचालय, रात्री थांबण्यासाठी अंथरुण, औषधे आणि खाण्याची आपत्कालीन व्यवस्था असेल. संपूर्ण यात्रा मार्ग १०-१० किलोमीटरच्या सेक्टरमध्ये विभागला आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये ६ पोलिस कर्मचारी असतील. ते बाइकवर गस्त करतील. व्हीआयपींना दिली जाणार दोन महिन्यांनंतरची वेळ बद्रीनाथ धामच्या पंडा पंचायतचे कोषाध्यक्ष अशोक टोडरिया यांनी सांगितले की, पैसे घेऊन दर्शन करवणे हे ईश्वराच्या मर्यादेच्या विरोधात आहे. विषम भौगोलिक परिस्थितीत गर्दी वाढल्यास व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य श्रद्धाळूंना त्रास होतो. व्हीआयपी दर्शन हा श्रद्धेचा अपमान असल्याने प्रशासनालाही स्पष्ट सांगण्यात आले की, यंदा व्हीआयपी दर्शन बंद ठेवावे. जर कोणी व्हीआयपी आला तरी त्याला दोन महिन्यांनंतरचा वेळ दिला जाईल. ९ लाख रजिस्ट्रेशन, सर्वाधिक केदारनाथसाठी या वर्षी यात्रेसाठी ६ दिवसांत ९ लाख श्रद्धाळूंनी रजिस्ट्रेशन केले. सर्वाधिक २.७५ लाख भाविक केदारनाथ धामसाठी व त्यानंतर बद्रीनाथमध्ये २.२४ लाख, यमुनोत्रीसाठी १.३४ लाख, गंगोत्रीसाठी १.३८ लाख आणि हेमकुंट साहिबसाठी ८ हजारांहून अधिक भाविक येतील.