छत्रपती शिवरायांची समाधी कुणी शोधली?:रोहित टिळकांनी सरसंघचालकांची री ओढत फुलेंचेही घेतले नाव, शिवजयंतीविषयी केला मोठा दावा

छत्रपती शिवरायांची समाधी कुणी शोधली?:रोहित टिळकांनी सरसंघचालकांची री ओढत फुलेंचेही घेतले नाव, शिवजयंतीविषयी केला मोठा दावा

रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. मोहन भागवतांच्या या विधानावर लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने रायगडवरील शिवरायांच्या समधीस्थळी बराच कचरा असल्याचे सांगितले, त्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा फुले हे गडावर गेले, असे रोहित टिळक म्हणाले. तसेच कोणी केले आणि कोणी नाही हे पाहण्यापेक्षा त्यांचे कार्य मोठे आहे, असेही त्यांनी म्हटले. सोलापूर येथे श्री भगवान परशुराम क्रिकेट प्रिमिअर लीग 2025 नुकतीच पार पडली. लोकमान्य टिळकांचे वंशज आणि काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना मोहन भागवतांच्या विधानाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले रोहित टिळक? रोहित टिळक म्हणाले की, प्रत्येक वेळी इतिहासाच्या संदर्भातून आपण निष्कर्ष काढत असतो. त्या काळात रायगड हा ब्रिटिश मिलिटरीच्या ताब्यात होता. तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नव्हती. त्यावेळी डगलस नामक ब्रिटिश अधिकारी रायगडावर गेला होता, त्याने सांगितले की शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी बराच कचरा साचला आहे. बॉम्बे बुक या पुस्तकात त्याने याबाबत लिहिले आहे. त्याने त्याकाळी लोकांना आवाहन केले होते की, तिथे समाधी अशा स्थितीत आहे. त्यानंतर त्या समाधीस्थळी साफसफाई सुरू झाली होती. लोकमान्य टिळक यांनी परवानगी घेऊन तिथे गेले, महात्मा फुले देखील तेथे गेले होते. त्यामुळे इतिहासाला धरून यावर बोलले जाते. त्यामुळे यात कोणी केले आणि कोणी नाही हे पाहण्यापेक्षा त्यांचे कार्य मोठे आहे. इतिहासात काही संदर्भानुसार आपण बोलतो, काही वर्तमान पत्र, पुस्तके यावरून बोलतो, असे रोहित टिळक यांनी म्हटले. शिवजयंतीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली डगलस हा अधिकारी रायगडावर गेल्यानंतर राज्यात मोठ्या चळवळी सुरू झाल्या. लोकमान्य टिळकांनी त्याबाबत पुण्यात मोठी सभादेखील घेतली होती. त्यात त्यांनी शिवरायांची जयंती साजरी व्हायला हवी, सर्वानी तिथे गेले पाहिजे असे सांगितले, असा दावा रोहित टिळक यांनी केला. मुळात हे सर्व इतिहासाच्या रेफरन्सवर बोलले जाते. त्यामुळे आपण ठोसपणे ते सांगू शकत नाही. म्हणून त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही, असेही रोहित टिळक यांनी म्हटले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून मुद्दामहून वाद उकरून काढण्यात येत आहे. शिवरायांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचा दावा सांगण्यात येतो. तर काही जण लोकमान्य टिळकांनी शिवरायांची समाधी शोधल्याचे बोलले जाते. त्यात आता लोकमान्य टिळकांचे वंशज आणि काँग्रेस नेते रोहित टिळकांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment