मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारभारला औरंगजेबाची उपमा:आपण आपल्या वक्तव्यावर ठाम, हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम नवमीनिमित्त नाशिक येथील काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. यावरून राजकीय पडसाद उमटण्यास सुरू झाले आहे. यावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले, त्यांच्या राज्यकारभाराला औरंगजेबाची उपमा दिली होती. त्यांच्या कार्यकाळात होत असलेल्या घटनांमुळे ती उपमा दिली असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र, या आधीचीच मदत त्यांना मिळालेली नाही. अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याने राज्यातील सर्वच घटक नाराज आहेत. सगळ्यांना समान न्यायाने हक्क मिळावेत यासाठी संविधानाला स्मरून आमचा लढा सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच मूळ संविधानात श्रीरामाचा फोटो होता आणि आताही तो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यासह देशात सुलतानी आणि आसमानी संकटे कोसळत आहेत. समानतेच्या संधी नाकारल्या जात आहेत. शेतकरी संकटात आहे. त्या सर्वांना समानतेचे चांगले दिवस यावे, यासाठी प्रभू रामांना साकडे घातले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.