मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ यांना तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील:पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो, गिरीश महाजन यांचे विधान

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्यानेच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच दिले जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ यांना तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील, असे विधान महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांना छगन भुजबळ हे नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करू शकतात अशी चर्चा सुरू असल्याचे विचारले तेव्हा ते म्हणाले, पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो. त्याला काहीच हरकत नाही. पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी जर मनात आणले तर भुजबळांना पालकमंत्री करतील. फडणवीस भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्रीही करू शकतात. या विधानाला नंतर सारवासारव करताना गिरीश महाजन म्हणाले, छगन भुजबळ यांनी असा कोणताही दावा केला नाही, उगाच अशा चर्चा करून तेल ओतू नका. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांचे कर्तव्य बजावले नाही. त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद कसपटे कुटुंबीयांना मिळाला नाही, अशी तक्रार करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोहिणी खडसे यांच्या पत्राचा विचार करतील, असे म्हटले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी त्यांचे कर्तव्य बजावले नाही, त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद कस्पटे कुटुंबीयांना मिळाला नाही अशी तक्रार करत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे.