मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणे सोडावे:डॉ. बाबासाहेब जास्त जगले असते तर पंतप्रधान झाले असते – रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून जास्त जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असे विधान आठवले यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मनसे व हिंदी भाषा वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते. तसेच पुढे बोलताना आठवले यांनी वक्फ विधेयकावरही सरकारची बाजू मांडली आहे. वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये 99 टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात 370 कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे. मात्र भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमांच्या विरोधात नाही, असे म्हणत आठवले यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. औरंगजेब कबरीचा वाद जास्त वाढू नये रामदास आठवले औरंगजेब कबरीच्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पाहिल्यानंतर वाद समोर आला. मात्र शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव होते. सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे आणि हा वाद जास्त वाढू नये, असे माझे मत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत दरम्यान, मुंबईत मराठी भाषा आणि हिंदी भाषिकांचा वाद चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत. मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर देखील रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे पक्षाची मान्यता रद्द करू नये, मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सर्वांना सावरण्याचे काम मुंबईने केले आहे, असेही आठवले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणे सोडावे रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणे सोडावे. एक तर जाऊच नये. ते दोन-तीनदा जाऊन आले आहेत. मुंबई बदनाम करून इकनॉमी कमी करण्याचे काम आहे. ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मनसेने विकासाबद्दल बोलले पाहिजे. अशी दादागिरी करणे योग्य नाही, बँकांमध्ये अशा पद्धतीने मराठीचा आग्रह करणे चुकीचे आहे. राज ठाकरेंना देखील याबद्दल सद्बुद्धी देवो. अनावश्यक विषय समोर आणू नये. राज ठाकरे यांनी लोकसभेला पाठिंबा दिला. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.