मुख्यमंत्र्यांचा विदर्भ पुन्हा हादरला:अल्पवयीन मुलींवर अत्याचारानंतर जमाव संतप्त, पोलिस ठाण्यावरच दगड फेक; लाठीचार्ज

पैसे व खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिमुर शहरात उघडकीस आली. रात्री साडेदहाच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. जमावाचा रोष बघता आरोपींनी पोलिस ठाण्यात शरण घेतली. संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्याला चार तास घेराव घालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. रात्री तिन वाजेपर्यंत चिमुर शहरात प्रचंड तणावपूर्ण स्थिती होती. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुर शहरातील एका वार्डातील एक 13 व 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणीं होत्या. त्या सोबत शिक्षण घेत होत्या. शेजारी राहत असल्याने घरासमोर नेहमी खेळायच्या. सोमवारी एका 13 वर्षाच्या मुलीने रात्री साडेआठच्या सुमारास घरी असताना आपल्या आईला दोघींसोबत घडलेल्या अत्याचाराच्या प्रकाराची माहिती दिली. मार्च महिन्यात दोघी मैत्रीनी दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत असताना परिसरात राहणारा आरोपी रसिद रूस्तम शेख (नड्डेवाला) याने खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलवले. दोघी मुली घरी गेल्यानंतर त्यांचे वर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसिर वजीर शेख (गोलावाला) यानेही त्या दोघींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दोघींवर अत्याचार केला. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार दोन्ही नराधम आरोपींकडून खाऊ देण्याच्या बहाण्याने सप्टेंबर महिन्यापासून अल्पवयीन मुलींवर वारंवार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तेरा वर्षाच्या मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पिडीतेच्या आईने चिमुर पोलिस ठाण्यात जावुन तक्रार दाखल केली. तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. दरम्यान रात्रीच या प्रकाराची माहिती चिमूर शहरात पसरल्याने या घटनेचा शहरात सर्वत्र निषेध होऊ लागला. पोलिस ठाण्यावर दगडफेक त्यामुळे प्रकरण चिघळले या प्रकारामुळे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमा होवून या घटनेचा निषेध करू लागले. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांपासून संभाव्य धोका लक्षात घेताच दोन्ही संशयित आरोपींनी रात्रीच चिमुर पोलिस ठाण्यात जावून शरण घेतली. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा जमाव झाला. रात्री साडे अकरा वाजताचे जमावातील काहींनी पोलिस ठाण्यावर दगडफेक त्यामुळे प्रकरण चिघळले. पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तर यामध्ये एक महिला पोलिस व अन्य एक असे दोघे पोलिस जखमी झाले. त्यामुळे पोलिस विभागाने जमावाला पांगवण्यासाठी ठाण्यासमोर जमावावर लाठीमार केला. यामध्ये दोघे व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरला पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे. तर जखमी पोलिसांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दगडफेकीच्या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार झाल्याने जमाव संतप्त झाला. अतिरिक्त पोलिस बलाची मागणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये या करीता अतिरिक्त पोलिस बलाची मागणी केली. भिसी, नागभीड, शेगाव येथून अतिरिक्त पोलिस बल मागविण्यात आले. तर चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांना देण्यात आली. अडीच ते तीन वाजेपर्यंत जमावाने ठाण्याला घेराव घालून आरोपींना आमच्या स्वाधीन करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, लाठीमार केलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली. चार तास जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. लाठीमार झाल्याची माहिती शहरात पोहोचताच पाचशे ते सहाशे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले होते. त्यांनतर लाठीमार घटनेचा निषेध म्हणून पोलिस ठाण्यासमोर टायरची जाळपोळ करून घटनेचा रोष व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. शहरात परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक, विविध पथकासह रात्री तिनच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात दाखल झाले. आणि चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगा नियंत्रण पथकाने परिस्थीती हाताळल्याने तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. आता चिमुर शहरात परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. आरोपी आणि पीडीताच्या घराशेजारी, तसेच शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोस्त लावण्यात आला आहे.