चौकशीची मागणी:उमरावती येथे 15 वा वित्त आयोगासह विकास कामात अफरातफरीची तक्रार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

फुलंब्री तालुक्यातील उमरावती ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोगासह विविध विकासकामांमध्ये लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आकृतीबंधानुसार काम न करता अर्धवट काम करून पूर्ण बिले उचलल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, पंचायत समिती अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार फुलंब्री यांच्याकडे करण्यात आली आहे.सन २०२२-२३ मध्ये १५ वा वित्त आयोगातून उमरावती शिवारात पाण्याची टाकी बांधून नागरिकांना पाणीपुरवठा करणे हा हेतू होता. मात्र, ग्रामपंचायतीने हा निधी तालुक्याबाहेर सिल्लोड तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वापरला. तेथे बांधकाम करून बिल उचलले. उमरावती जातवा शिवारात पिराच्या दर्गाजवळ अंदाजपत्रकानुसार टाकी न बांधता थातूरमातूर काम करण्यात आले. येथे वस्ती नसताना निकृष्ट दर्जाचे काम करून बिल उचलण्यात आले. दलित वस्ती उमरावती येथे १५ वा वित्त आयोगातून सार्वजनिक शौचालयाचे काम करण्यात आले. मात्र, शौचालय निकृष्ट दर्जाचे असून पाण्याची व्यवस्था नसताना बिल उचलले आहे. तांडा वस्ती योजनेतून बिरोबावाडी परिसरात सिमेंट रस्त्याचे काम करताना आकृतीबांधतील मटेरियलचा वापर न करता मातीमिश्रित वाळू वापरली. ८० मिमी ऐवजी कमी उंचीची जाडी ठेवून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले.या सर्व कामांमध्ये गुत्तेदारांनी सरपंच व ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखोंची अफरातफर केली आहे. अभियंत्यांनीही आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट कामांना अभय दिले. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे. सर्व व्यवहार व दस्तऐवज तपासून इस्टिमेटप्रमाणे काम न करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालय फुलंब्री येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या तक्रारीवर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दत्तात्रय खंबाट, कडूबाई अंबादास मतलबे, सिमरनबी नजबोद्दिन शेख, सादेकखा हुसेनखा पठाण, राहुल बारकू सोनवणे, अजिनाथ बाबुराव खंबाट, शिवाजी खंबाट यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उमरावती गावात सध्या विकास कामे जेसीबीद्वारे सुरू आहेत. कामाच्या चौकशीची मागणी : देवीची वाडी येथील सार्वजनिक शौचालायाच्या व मागास वर्गीय वस्तीतील शौचालायाचे काम, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत करण्यात आलेले काम,प्रभाग क्रमांक -१ मध्ये पेव्हर ब्लॉक कामात योग्य मटेरियलचा वापर न करता केलेले काम, मागासवर्गीय वस्ती येथे झालेल्या सभा मंडपाचे काम,दलीत वस्तीला विचारात न घेता स्लॅब एवजी पत्राचे शेड बांधून केलेले काम,महिला स्वायत्ता योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन चे प्रशिक्षण दिल्याचे भासून लाटण्यात बिले. जिल्हा परिषद शाळे समोरील पेव्हर ब्लॉकचे काम, नव्याने ड्रेनेज लाईनचे काम चालू असून काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने चालू असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोप चुकीचे, काम तपासा, मग आरोप करावेत ^तक्रार केलेल्या ग्रामस्थांनी केलेले आरोप चुकीचे असून त्यात कुठलीही सत्यता नाही शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कामे झालेले आहे.संबंधित कामाची पाहणी करावी. – रखमाजी जाधव, सरपंच पती