नागरिक कर भरण्यास तयार, मात्र आकारण्याकडे यंत्रणेचेच दुर्लक्ष:संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्याची कारवाई

नागरिक कर भरण्यास तयार, मात्र आकारण्याकडे यंत्रणेचेच दुर्लक्ष:संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्याची कारवाई

प्रतिनिधी | अमरावती नागरिक कर भरायला तयार आहेत, परंतु यंत्रणा कर आकारणीला तयार नाही. दुसरीकडे एकाने जमिनीचा नमूना ‘आठ-अ’ मागितला. परंतु ग्रामसेवकाने तो न दिल्याने शासनाचा कर बुडतो आहे. असे अनेक मुद्दे जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनात ऐकायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी गेल्या महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी ‘तक्रार निवारण दिन’ भरवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या सोमवारी कारवाई दरम्यान व्यक्तीगत आणि सार्वजनिक स्तरावरील सात तक्रारी प्राप्त झाल्या. सीईओंनी स्वत:च्या दालनातच या तक्रारदारांसोबत संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेत ज्या अधिकाऱ्यांमुळे ही कामे अडली, त्यांच्याकडून खुलासा मागवण्याची कारवाई सुरू केली. यातील एका प्रकरणाचा खुलासा त्यांनी २४ तासांच्या आतच मागवला आहे. भातकुली तालुक्यातील नवथळ येथील सुखदेव रायबोले यांनी एक तक्रार केली आहे. त्यांच्या मते, एका प्रकरणाच्या अनुषंगाने गावात चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी विस्तार अधिकारी तेलंग यांना २८ फेब्रुवारीला हजर राहावयाचे होते. महसूल विभागाचे अप्पर आयुक्त आणि ज्यांच्यासमोर त्यांनी ही तक्रार मांडली, त्या सीईओंचे तसे पत्रही होते. परंतु तेलंग हजर झाले नाही. त्यामुळे प्रकरण अजूनही अधांतरीच आहे. त्यांची ही तक्रार ऐकल्यावर सीईओ महापात्र यांनी पुढील २४ तासांच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडून खुलासा मागवला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहुरचे अमोल ठाकरे यांनी त्यांच्या घराची कर आकारणी न केल्याची तक्रार केली आहे. त्यांनी आपल्या इमारतीला कर लावावा, असे स्वत:हून यंत्रणेला सांगितले. परंतु तेथील ग्रामसेवकाने अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे मी कसा भरू, असा त्यांचा प्रश्न आहे. सर्वसामान्यांना चक्रावून सोडणाऱ्या या प्रश्नामुळे हे शासनाचे नुकसान नव्हे काय, असा प्रतिप्रश्नही तक्रारदाराने उपस्थित केला आहे. असाच एक मुद्दा टेंभा (ता. अमरावती) येथील प्रभाकर ठाकरे यांचा आहे. त्यांनी आपल्या मालकीच्या जागेचा नमूना आठ-अ मागितला. परंतु तो न मिळाल्यामुळे त्यांना कर भरता आला नाही. याशिवाय श्यामकांत देशमुख, नीलेश वानखडे, स्वप्नील निमकाळे व संदीप वानखडे यांनीही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सीईओंकडे तक्रारी सादर केल्या. आतापर्यंत ६ तक्रारी काढल्या निकाली आतापर्यंत तिनदा आयोजित तक्रार निवारण दिनात सीईओंकडे एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. त्यामुळे १९ तक्रारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्या असून, त्यासंदर्भातील प्रशासकीय बाजू पुढील तक्रार निवारण दिनापूर्वी तक्रारदार व जि. प. प्रशासनाला कळवण्याची सूचना सीईओंनी केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment