कॉंग्रेसच्या नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश:कोकण पुन्हा मिळवणार, सहदेव बेटकरांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

कॉंग्रेस पक्षाचे सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सहदेव बेटकर यांनी मातोश्री येथे जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे. सहदेव बेटकर हे रत्नागिरी येथील कॉंग्रेस नेते असून त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत तसेच विनायक राऊत उपस्थित होते. कुरुक्षेत्राचे युद्ध आपण जिंकणार – संजय राऊत यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज सगळे कोकणचे सुपुत्र येथे हजर आहेत, त्यात भर पडली आहे आता सहदेवाची. इथे महाभारतातली सगळी पात्र उपस्थित आहेत. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण आणि संजय म्हणजे फार महत्त्वाचे पात्र असून ते आता श्रीकृष्ण यांच्यासोबत आहेत. तसेच सहदेव देखील श्रीकृष्णासोबत आले आहेत. आता कुरुक्षेत्राचे युद्ध आपण जिंकणार आहोत. मी उद्धव साहेबांना इतकेच सांगेल, आपण फक्त कोकणात एक दौरा करा. आपण कोकणच्या भूमीवर पाय ठेवा, मग बघा. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ. मी माझ्या घरात वापस आलो – सहदेव बेटकर सहदेव बेटकर यावेळी म्हणाले, मातोश्रीवर 1992 साली मी मोठ्या साहेबांचे दर्शन घेतले होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नाराज नाही. मी माझ्या घरात वापस आलो आहे. विनायक राऊत यांच्या आशीर्वादाने मी येथे आलो आहे. तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की याचा आवाज तळकोकणात गेला असेल. शिवसेना वाढवण्यासाठी शिवसैनिक अहोरात्र काम करत आहेत. कोकण पुन्हा मिळवणार – उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत म्हणाले की कोकणात एक पाऊल ठेवा, मी सांगतो केवळ पाय नाही तर पूर्ण कोकणच पुन्हा मिळवणार आहे. बघू कोण आडवा येतो ते. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. आम्हाला फसवले गेले, आता खरी गरज या शिवसेनेची गरज महाराष्ट्राला आहे. दिलेला शब्दाला पाळणारी केवळ शिवसेना आहे. शिवसेना एकच आहे, दुसरी आहे ती कोण आहे एसंशी! स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली ही माणसे आहेत. माझ्यासोबत जी आहेत ती सर्वसामान्य माणसे आहेत. आपापसात जे काही कुरघोडी झाल्या तरी पक्ष सोडून जाऊ नका, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सहदेव बेटकर यांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे येत्या काळात महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. कोकणासाह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवायचा आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.