दगडूशेठ गणपती मंदिराचा वर्धापन दिन:५ दिवसांचा संगीत महोत्सव; शिवमणी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह दिग्गज कलाकारांचा सहभाग

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. ३० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी सौरभ रायकर, यतीश रासने, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उप- शास्त्रीय संगीत, नाटयपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे. संगीत महोत्सवाचा प्रारंभ रविवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, पंडित रविचारी, रुना रिझवी शिवमणी व सहका-यांच्या पुष्पांजली या कार्यक्रमाने होणार आहे. त्यापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजन करून गुढी उभारण्यात येणार आहे. संगीत महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ६. ३० वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित राहणार आहेत. संगीत महोत्सवात सोमवार, दि. ३१ मार्च रोजी पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील व सहका-यांची शास्त्रीय, उप-शास्त्रीय, नाटयपद व भक्तीसंगीताची मैफल होणार आहे. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी हर्ष, विजय, ईश्वर अंधारे व सहका-यांचा नाविन्यपूर्ण असाद फोक आख्यान – थाट ह्यो जुना, खेळ हा नवा… हा कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. बुधवार दि. २ एप्रिल रोजी प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा बाबुजी आणि मी हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमाने होणार असून पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत अभिनेते रवींद्र खरे हे घेणार आहेत. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटरसमोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.