दहा शिवार रस्ते झाले मोकळे, शेकडो शेतकऱ्यांना दिलासा:अमळनेर तालुक्यात महसूल विभागाने पाच गावात राबवली मोहीम

येथे अतिक्रमित गाव नकाशावरील शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेत अमळनेर तालुक्यातील पाच गावातील दहा रस्ते अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले. पिंपळे खुर्द येथील साडे पाच किमी अंतराचे तीन शिवार रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले. शिवार रस्ते मोकळे करण्याआधी झालेल्या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी सहमती दर्शवल्याने शांततेत व सामंजस्याने हे शिवार रस्ते मोकळे करण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अव्वल कारकून (रोहयो) ए.डी.परदेशी, भूमी अभिलेख विभागाचे ए.के.गिरी व एस.एम थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) किशोर बी. ठाकरे, युवराज पाटील, तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, पोलिस पाटील, सुदाम बळीराम पाटील यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने काम पूर्ण झाले. अतिक्रमित गाव नकाशावरील शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेत अमळनेर तालुक्यातील पाच गावातील दहा रस्ते अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. शेतरस्ता नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. शेतमाल तसेच अन्य वाहतुक व शेती संबधित कामांना मोठी अडचण येत होती. शेत रस्ते मोकळे झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.