सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख:शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी आता पुन्हा नवीन तारखा!
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेसंबंधित प्रकरणावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी होत नसल्यामुळे सतत नवीन तारखा देण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीसाठी नवीन तारखा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 10 डिसेंबरला होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह व नावाच्या वादावर 13 नोव्हेंबरला सुनावणी होईल, तर शिवसेना पक्ष चिन्ह व नावाच्या वादासंबंधी सुनावणी 18 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी कार्यालयीन निरोप देण्यात आला आहे. तसेच 10 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे 10 तारखेला होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. आमदार आपत्रतेच्या प्रकरणावर यापूर्वी 29 जुलै 2024 रोजी सुनावणी करण्यात आली होती. यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस देखील बजावली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून 15 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी झाली व शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. 7 मार्च 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला का? असा प्रश्न विचारला होता आणि विधानसभा अध्यक्षांसमोरील मूळ सुनावणीचे कागदपत्रे मागवली होती. 23 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी होती मात्र वेळेअभावी होऊ शकली नव्हती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड निवृत्त
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना शुक्रवारी कार्यालयीन निरोप देण्यात आला आहे. 10 तारखेला ते निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. चंद्रचूड यांनीच सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती. संजीव खन्ना हे 64 वर्षांचे असून 13 मे 2025 रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा केवळ 6 महिन्यांचा असणार आहे. संजीव खन्ना यांनी 65 निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले आहेत. संजीव खन्ना हे 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिले आहेत.