ईव्हीएमविरुद्ध इंडिया आघाडी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार:दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील विरोधकांची इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार) शरद पवार, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ विधिज्ञ व काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी मंगळवारी सांगितले. जगताप यांचा पुण्यातील हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीने ४६ जागा जिंकल्या. २८८ जागांत १४४० व्हीव्हीपॅटच्या जुळणीत कोणताच घोळ नाही निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या मतांची व्हीव्हीपॅट स्लिपच्या जुळणीत कोणतीही अनियमितता आढळली नाही. आयोगाने सांगितले, २३ नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी २८८ मतदारसंघांतील १४४० व्हीव्हीपॅट युनिट्सच्या स्लिप्सची जुळवणी करण्यात आली. यात कोणतीही अनियमितता आढळून आली नाही.