धुळे जिल्ह्यात व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव:विधानसभा निवडणुकीत त्याला उत्तर देण्याची वेळ; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
धुळे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा उल्लेख करत सर्वांनी या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. एकीकडे आम्ही विकास करत आहोत. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहोत. मात्र, आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही, म्हणून आमच्या विरोधकांनी लोकसभेपासून नवीन स्ट्रॅटर्जी आखली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यात व्होट जिहाद होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी पुन्हा केला आहे. धुळ्याच्या लोकसभा निवडणुकीत पाच मतदारसंघात एक लाख 90 हजार मतांनी आम्ही पुढे गेलो होतो. मात्र एकट्या मालेगाव सेंट्रल मधून चार हजार मतांनी आम्हाला पराभूत व्हावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावे लागेल. ही निवडणूक जागे होण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरोधात एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. महाराष्ट्राच्या भूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ही खानदेशातून होत आहे. त्यातही याची सुरुवात धुळ्यातून होत आहे याचा मला विशेष आनंद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात जे काम झाले आहे, त्यामुळे पुढच्या पाच वर्षात धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर वन जिल्हा होईल, असा दावा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सुलवाडे जामफळच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीपर्यंत पाणी जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्यामध्ये होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. अक्कलपाडा धरणाची उंची वाढवून धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही, अशा प्रकारचे काम होताना पाहायला मिळत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मनमाड -इंदोर रेल्वेच्या माध्यमातून धुळ्यामध्ये मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसह अनेक प्रकल्प जोडले गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुढचे इंडस्ट्रीज सेंटर धुळे जिल्हा असेल, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. धुळे जिल्ह्याला सहा राष्ट्रीय महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ज्या धुळ्याला नंबर वन करण्याचा चंग नरेंद्र मोदी यांनी ठेवला आहे. त्याच धुळ्यातून मोदींच्या सभेची सुरुवात झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही जागा या महायुतीच्या निवडून येतील, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.