दिल्लीत शहांच्या भेटीनंतर मुंडेंचा राजीनामा होईल:तृप्ती देसाई यांचा मोठा दावा, म्हणाल्या – अमित शहा महायुतीची बदनामी सहन करणार नाहीत
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. राज्यात त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला असताना ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरून तृप्ती देसाई यांनी मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीत अमित शहांना भेटतील आणि भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, असे त्या म्हणाल्या. तृप्ती देसाईंच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. केवळ विरोधी पक्षच नाही तर महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांकडून देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर गेलेत. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. आपले पद वाचवण्यासाठी मुंडे हे अमित शाह यांना भेटायला गेले, असा आरोप राऊतांनी केला. तर आता तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे दिल्लीहून परतल्यानंतर राजीनामा देतील, असे मोठे विधान केले आहे. नेमके काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
धनंजय मुंडेंचा वाल्मीक कराडशी थेट संबंध आहे. त्यामुळे आतापर्यंत नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा देणे गरजेचे होते. अंजली दमानिया यांनी पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे वेळ कशाला वाया घालवत आहेत. धनंजय मुंडे सध्या दिल्लीला गेलेले आहेत. अमित शहा जास्त काळ महायुतीची बदनामी सहन करणार नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीत अमित शहांना भेटतील आणि भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल. आतापर्यंत मुंडे यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता. अमित शहा निश्चितच त्यांचा राजीनामा घेतील, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. मुंडे जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीड बदनाम होत राहील. कारण बीडची बदनामी ही त्यांच्या टोळीमुळे झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. माझ्या नैतिकेनुसार मी दोषी नाही – धनंजय मुंडे
माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही. मी जर दोषी असेल, तर दाखवून द्या, मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मला टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी जर दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा. तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, केवळ विषय काढून राजीनामा मागितला जात असेल तर काय बोलणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हेच माझ्या राजीनामा मागू शकतात. त्यामुळे सर्व गोष्टी क्लियर राहायला पाहिजे, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. राजीनाम्याचा दबाव वाढत असतानाच मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री पल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चॅनलवर रोज नवीन पुरावा, अजून काय पुरावे पाहिजेत?
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आज धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली.अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सर्वांवर ऐकीव बातम्यांवर कारवाई झाली होती. धनंजय मुंडेंबाबत तर चॅनलवर रोज एक नवीन पुरावा येत आहे, अजून काय पुरावे पाहिजेत? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. माझ्यामुळे 50 दिवस रोज पक्षाची हेडलाईन होत असेल, तर मी मी नैतिकतेने पहिल्याच राजीनामा दिला असता, असेही त्या म्हणाल्या.