अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करा:खासदार नीलेश लंके यांची संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी
अहिल्यानगर -पुणे इंटरसिटी रेल्वे मार्गाचे काम केवळ देखभाल दुरूस्ती सुविधा (मेंन्टेनन्स पॉईंट) उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधताना खासदार लंके यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. खासदार लंके म्हणाले, छत्रपती संभाजीनगर ते नगर व नगर ते पुणे रेल्वेमार्ग अनेक महत्त्वाच्या शहरांशी संबंधित आहे. या मार्गावर श्रीक्षेत्र देवगड, श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर, श्रीक्षेत्र शिर्डी आणि गणपती रांजणगाव ही महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या मार्गावर वाळुंज (छत्रपती संभाजीनगर), सुपे, रांजणगाव पुणे ही औद्योगिक क्षेत्रे आहेत. तिथे काम करणारे अनेक मजूर, कामगार, व्यापारी यांना दैनंदिन प्रवास करावा लागतो. हा रेल्वे मार्ग झाल्यास अनेक प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठीही सुविधा उपलब्ध होईल. या मार्गावर पुणे, संभाजीनगर व शिर्डी ही विमानतळे असल्याने हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. तसेच अहिल्यानगर-कल्याण रेल्वेमार्गाचे काम सुरू होणे महत्त्वाचे आहे. बीड, नगरचे लोक पुणे, मुंबई, कल्याणशी निगडीत आहेत. त्यासाठी हा मार्ग सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खासदार लंके यांनी केली. अहिल्यानगर मतदारसंघातील निंबळक हे गाव नगर शहराशी निगडीत आहे. या गावाजवळील रेल्वेमार्गावर उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. २५ ते ३० गावांचा रोजचा संपर्क या मार्गावरून आहे. दर १५ मिनिटांनी रेल्वे क्रॉसिंगसाठी हा मार्ग बंद असतो. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी खासदार लंके यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास शुल्कात सवलत द्या अनेक वर्षे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास शुल्कात सवलत देण्यात येत होती. कोरोना काळात ही सवलत बंद करण्यात आलेली आहे. साठ वर्षे वयावरील पुरुषांसाठी तर ५८ वर्षांवरील महिलांसाठी ४० ते ५० टक्के सवलत देण्यात येत होती. ही सवलत पूर्ववत सुरू करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी खासदार लंके यांनी संसदेत केली.