अपघातात जखमी तरुणाच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा:एकनाथ शिंदे गाडीतून उतरून मदतीसाठी धावले, ताफ्यातील गाडी देत उपचारासाठी पाठवले

अपघातात जखमी तरुणाच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा:एकनाथ शिंदे गाडीतून उतरून मदतीसाठी धावले, ताफ्यातील गाडी देत उपचारासाठी पाठवले

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. एकनाथ शिंदे हे वैद्यकीय मदतीसाठी नेहमीच धावून येतात. प्रजासत्ताक दिनी त्यांचा ताफा मुंबईकडे येत असताना एका दुचाकीस्वार अपघातग्रस्ताला त्यांनी ताफा थांबवत मदत केली आहे. एकनाथ शिंदे यांचा ताफा द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता त्यांना एका दुचाकीचा अपघात झालेला दिसला व तिथेच तरुण जखमी अवस्थेत त्यांना दिसून आला. एकनाथ शिंदे यांनी तत्काळ ताफा थांबवलं आणि तरुणाच्या मदतीसाठी धावून गेले. तरुणाची विचारपूस देखील त्यांनी केली. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात न्यायला सांगितले. रुग्णालयात पाठवताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी तसेच एक पोलिस त्याच्या सोबत पाठवत राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे यांनी तरुणाला गाडीत बसवत, तू सुखरूप आहेस. काळजी करू नको, आपण तुला पूर्ण बरे करू, असे सांगत आधार दिला. त्यांच्या या कृतीने पुन्हा एकदा त्यांची संवेदनशीलता सर्वांनाच दिसून आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबई येथील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे निघाले होते. तिकडे जाताना ही घटना घडली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे नेहमीच स्वतःला कॉमन मॅन म्हणतात. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे ते मुख्यमंत्री असताना म्हणत होते. आता उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड कॉमन मॅन असे म्हंटले होते. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेकांना मदत केली आहे. तसेच वैद्यकीय मदतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment