देव तारी त्याला कोण मारी:तिसऱ्या मजल्यावरून पडले 2 वर्षांचे बाळ, भावेशच्या रूपात धावत आला देवदूत
डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुकला खाली पडला. पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यक्ष दर्शनच झाले. एवढ्या उंचावरून पडूनही बाळाचे प्राण वाचले आहेत. त्याला वाचवण्यासाठी देखील जणू भावेशच्या रूपात देवदूतच आला होता. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा 35 वर्षीय युवक इमारत बांधकाम करण्याचे तसेच घरच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. शनिवारी या परिसरात अनुराज या इमारतीत ग्राहकांना घर दाखवण्यासाठी भावेश गेला होता. ग्राहकांना घर दाखवून बाहेर येत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरात रंगकाम सुरू होते. रंगाने काचा खराब होऊ नयेत म्हणून बाल्कनीच्या काचा काढल्या होत्या. याच गॅपमधून दोन वर्षांचे बाळ खाली पडताना भावेशने पहिले आणि चपळता दाखवत भावेशने बाळाच्या दिशेने धाव घेतली व बाळाला पकडले. मात्र हातून बाळ थोडक्यात निसटले आणि खाली पडले. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून पडून देखील बाळाचा जीव वाचला आहे. भावेशने दाखवलेल्या चपळतेमुळे बाळाचा जीव वाचला असून आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुदैवाने इमारती मधून बाहेर पडलेला भावेश मागे वळून ग्राहकांशी बोलत असतानाच त्याने खाली पडणाऱ्या चिमुरड्याकडे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला. इमारतीच्या सीसीटीव्हीत हा घटनेचा थरार कैद झाला असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ