देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर

देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका… सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष… राज्याच्या राजकारणात सध्या सर्वांच्याच केंद्रस्थानी एक नाव कायम आहे… ते म्हणजे देवेंद्र फडणवीस…. तब्बल 40 वर्षानंतर आपला पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रातील राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. त्यांच्या या कार्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कार्यकाळत सलग 5 वर्षे, 12 दिवस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे गेले. यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा मुख्यमंत्री बनला. देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. फडणवीस मुख्यमंत्री होण्याची मुख्य कारणे मुख्यमंत्रीपद मिळविण्यात फडणवीस यांच्यासाठी पक्षप्रमुखपद अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्याच नेतृत्वाखाली 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. पण फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे हे एकमेव कारण नव्हते. संघाच्या विचारसरणीने तयार झालेल्या फडणवीसांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचंड विश्वास आहे. शिवाय त्या वेळी इतर राज्यांमध्ये बहुसंख्य समाजातून नव्हे तर अल्पसंख्याक समाजातून मुख्यमंत्री बनवण्याची भाजपची रणनीती होती. हरियाणात बिगर जाट मनोहर लाल खट्टर, झारखंडमध्ये बिगर आदिवासी रघुबर दास आणि महाराष्ट्रात बिगर मराठा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही फडणवीसांवर विश्वास दाखवला. या सर्व कारणांमुळे राज्यात फडणवीस यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते असताना फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. अनेक संकटाचा सामना मराठा समाजाच्या व्यतिरिक्त मराठेतर समाजातील मुख्यमंत्री करण्याचा फायदा झाला आणि भाजपला महाराष्ट्रात बिगर मराठ्यांचा पाठिंबा मिळाला. 40 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस सध्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले नेते आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यशैलीचा अवलंब केला. वास्तविक फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक संकटाचा सामना केला. पण त्यांनी केवळ पक्षांतर्गत शत्रुत्वावर नियंत्रणच ठेवले नाही तर मित्रपक्ष शिवसेनेकडून निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीलाही त्यांनी हाताळले. फडणवीस यांना इंदिरा गांधींचा तिरस्कार देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरच्या मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे संघाचे प्रचारक तसेच भाजप नेते होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गंगाधरराव फडणवीस यांना आपले ‘राजकीय गुरू’ मानत. देवेंद्र फडणवीस सहा वर्षांचे असताना 1975 मध्ये देशभरात आणीबाणी लागू झाली. या कार्यकाळात त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना अटक करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना इंदिरा गांधींचा तिरस्कार वाटू लागला. मात्र, देंवेंद्र हे ज्या शाळेत शिक्षण घेत होते, त्या शाळेचे नाव इंदिरा गांधी यांच्या नावावरुन इंदिरा कॉन्व्हेंट स्कूल असे होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचे नाव असलेल्या शाळेत शिक्षण घेण्यास नकार दिला. त्यांनी ती शाळा सोडून सरस्वती शिशु मंदिर विद्यालयातून पुढील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच धरमपीठ कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी तर 1992 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी जर्मनीच्या बर्लिन शहरात असलेल्या जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमधून व्यवसाय व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर 1987 मध्ये देवेंद्र फडणवीस 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 1989 मध्ये, महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP चे सक्रिय सदस्य बनले. 1992 में नागपुर नगर पालिकेत फडणवीस नगरसेवक झाले. 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. महापौर झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी देवेंद्र फडणवीस 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. 2004 मध्ये ते त्याच मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2009 ते 2019 पर्यंत सलग 3 वेळा नागपूर दक्षिण पश्चिममधून आमदार म्हणून निवडून आले. कपड्याच्या दुकानासाठी केली मॉडेलिंग देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे. 2006 मध्ये देवेंद्र फडणवीस आमदार होते. नागपूर शहरातील एका कपड्याच्या दुकानासाठी त्यांनी मॉडेलिंग केली. नागपूर शहरातील प्रत्येक चौकात कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीत फडणवीसांचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले. ही बातमी भाजपचे तत्कालीन सर्वांत मोठे नेते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत पोहोचली. काही दिवसांनी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले. वाजपेयींनी त्यांचे स्वागत केले होते आणि म्हणाले या, मॉडेल आमदार या, फडणवीसांच्या बाबतीतला अनेक किस्स्यांपैकी हा किस्सा कायच चर्चेत राहिला. देवेंद्र हे अमृता यांना मित्राच्या घरी भेटले, नंतर लग्न ठरले नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरचे सीईओ शैलेश जोगळेकर एका मुलाखतीत सांगतात की ते 2005 पासून अमृता आणि देवेंद्र दोघांचे कॉमन मित्र आहेत. 2005 मध्ये एके दिवशी अमृता आणि देवेंद्र त्यांच्या घरी पहिल्यांदा भेटले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा आमदार झाले. अर्ध्या तासात येतो असे सांगून अमृता घरून आली होती. मात्र, देवेंद्र यांची भेट घेतल्यानंतर त्यांची बैठक सुमारे दीड तास चालली. दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांना आवडू लागले. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाल्या होत्या, ‘देवेंद्रला भेटण्यापूर्वी मी नर्व्हस होते. मी तणाव आणि दबावात होते. मी विचार करत होते की, देवेंद्र हा कोणत्या प्रकारचा माणूस असेल. नेत्यांबद्दल माझ्या मनात नकारात्मक प्रतिमा होती, पण त्यांना भेटल्यानंतर मला वाटले की, ते एक अस्सल आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहेत. काही काळानंतर, देवेंद्र आणि अमृता यांच्या आईने मिळून लग्न निश्चित केले, त्यानंतर 17 नोव्हेंबर 2005 रोजी दोघांचे लग्न ठरले. अमृता यांनी सांगितले की, त्यांना देवेंद्रची गाणी ऐकायला आवडतात. अनेकदा त्यांना वेळ असताना त्या नवऱ्याची गाणी ऐकतात. या दोघांना दिविजा फडणवीस नावाची मुलगी आहे. अमृता रानडे फडणवीस या व्यवसायाने बँकर, अभिनेत्री आणि गायिका आहेत. त्याचे आई-वडील नागपुरात डॉक्टर आहेत. गोपीनाथ यांच्याशी हातमिळवणी करून गडकरींच्या विरोधकांना यश मिळाले ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा गडकरी हे नागपूर विभागातील भाजपचे एकमेव मोठे नेते होते. फडणवीस यांच्या वडिलांच्या आश्रयाने राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या नितीन गडकरी यांनी देवेंद्र यांना विधानसभेचे तिकीट मिळवून दिल्याचे बोलले जाते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यावेळी विदर्भ आणि नागपूर भागात भाजपच्या कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरींसोबत देवेंद्र फडणवीस अनेकदा व्यासपीठावर दिसले. त्यानंतर नितीन गडकरींना भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे आव्हान येऊ लागले. बदलती राजकीय समीकरणे पाहून देवेंद्र फडणवीस हे गडकरींपासून दुरावले आणि पक्षात त्यांचे विरोधक मानल्या जाणाऱ्या गोपीनाथ यांच्याशी हातमिळवणी केली. लवकरच फडणवीसांचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आणि कधीही मंत्रीही न झालेले फडणवीस भाजपचे प्रमुख होण्यात यशस्वी झाले. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. आता भाजपने महाराष्ट्रात बिगर मराठा नेत्याला पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीत फडणवीस यांचे नाव प्रथम आले. नंतर पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या वेळी बिहार, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून पाठवले. त्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांचा पक्षातील मान वाढला. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ सर्वात कमी काळाचा विक्रम
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ता समिकरणे बदलली. मुख्यमंत्री पदावर दावा सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती कायम ठेवण्यास नकार दिला. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी देखील पूर्ण केली. महाविकास आघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच अचानक पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे वृत्त समोर आले. मात्र, या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची साथ मिळाली नाही. 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या 5 दिवसांच्या कार्यकाळात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होते. यासह त्यांच्या नावावर सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री पदी राहण्याचा नवा विक्रम जोडला गेला. पंतप्रधान मोदींनी नाराज देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार केले? तारीख- 28 जून 2022. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव सरकार अल्पमतात आले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. उद्धव सरकार अल्पमतात आल्याचे देवेंद्र यांनी राज्यपालांना सांगितले. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना फ्लोर टेस्ट पास करण्याचे आदेश दिले. राज्यपालांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फ्लोर टेस्टवर बंदी घालण्यास नकार दिला. येथूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा खेळ सुरू झाला. 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. भाजपला 106 आमदारांव्यतिरिक्त शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांचा पाठिंबा होता. सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात होते. उद्धव यांनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होणार असे सर्वांना वाटत होते. जितेंद्र दीक्षित त्यांच्या ’35 दिवस- महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले’ या पुस्तकात लिहितात की देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत सर्वांना आश्चर्यचकित केले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेने सर्वांनाच धक्का बसला. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण सरकारमधून बाहेर राहणार असल्याचेही सांगितले. काही वेळानंतर महाराष्ट्र राजभवनाच्या सभागृहात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार होता. राजभवन माणसांनी खचाखच भरले होते. सभागृहात देशातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण उपस्थित होते. स्टेज पूर्णपणे सज्ज झाला होता. मंचावर दोन लाल रंगाच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. एक महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी आणि दुसरा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या व्यक्तीसाठी. शपथविधीपूर्वीच मंचावर अचानक हालचाल झाली. आता स्टेजवर दोन खुर्च्यांऐवजी तीन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्वांना जाणून घ्यायचे होते की तिसरी खुर्ची कोणासाठी आहे? काही वेळाने राज्यात उपमुख्यमंत्रीही असणार हे सर्वांना कळले. काही वेळाने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस हे कारसेवक म्हणून राम मंदिर आंदोलनात सहभागी झाले असल्याचे त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते.
‘मी महाराष्ट्राचा सीएम’ या ‘दिव्य मराठी’च्या विशेष मालिकेत आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पाहूयात भाजपची साथ सोडून ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा प्रवास आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या आणखी बातम्या वाचा….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment