महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील:केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्ट संकेत; राजकीय वर्तुळात चर्चा
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेत आगामी काळात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत तेच मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच आणायचे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदाबाबत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत चांगलीच खलबते सुरू आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान असले आणि 23 रोजी निकाल लागणार असला तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत सुरुवातीपासूनच चर्चा रंगली आहे. त्यात महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या वादात आता अमित शहा यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे संकेत दिल्याने याबाबत राजकीय चर्चा रंगली आहे. एकत्र बसून निर्णय घेणार – अजित पवार मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही शहा यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही महायुती म्हणून याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. मात्र, अमित शहा यांनी जे संकेत दिले आहेत याबाबत विचारले असता, तो त्यांचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे युतीमध्ये दोन पावले मागे यावे लागतात तर कोणाला दोन पावले पुढे जावे लागत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.