देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार:मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटवणार, पाणीपुरवठा मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा शब्द

देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार:मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटवणार, पाणीपुरवठा मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा शब्द

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत विजय मिळवला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशन देखील नागपूर येथे पार पडले आणि खातेवाटप देखील आता पार पडले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा खाते देण्यात आले आहे. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा खाते मिळाल्याने आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार असल्याचे म्हंटले आहे. ज्या योजना प्रलंबित आहेत त्या पूर्ण करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा
गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्याकडे पूर्वी असलेले खातेच पुन्हा मला मिळाला आहे. मला पुन्हा पाणीपुरवठा हे खाते मिळाल्याने आनंद झाला आहे. राज्यात पाणीपुरवठाच्या काही योजना या पूर्ण झाल्या आहेत. तर काही योजना अद्याप प्रलंबित आहेत. या पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खाते देण्यात आले, याचा आनंद आहे. ग्रीड मराठवाडा प्रोजेक्ट पूर्ण करणार
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ग्रीड मराठवाडा हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा महाराष्ट्रातील स्वप्नातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मराठवाडा ग्रीड हा प्रकल्प 30 हजार कोटींचा आहे. केंद्राच्या मंजुरीच्या आशेवर त्याचा डीपीआर आम्ही तयार केला आहे. या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आयुष्यभर माझेही नाव त्याला जोडले जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना सुरू करणार
राज्यात पाणीपुरवठ्याच्या जवळपास सर्व योजना पूर्ण करण्याचा निर्धार मी केला आहे. मात्र काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे हे संथ गतीने सुरू आहेत. मात्र आता जी कोणती कामे थांबले आहेत, त्या पुन्हा कशा सुरु करता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हंटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment