धनंजय मुंडे, अंबादास दानवे यांची भाऊबीज साजरी:मोठ्या बहिणींनी लहानपणापासून सांभाळले, त्यांचे आशीर्वाद महत्वाचे – धनंजय मुंडे
कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज भाऊबीज साजरी केली. धनंजय मुंडे यांनी आपल्या मोठ्या भगिनी उर्मिला मधुसूदन केंद्रे यांच्या समवेत भाऊबीज साजरी करत आशीर्वाद घेतले. यावेळी उर्मिला यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण करत त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी अगदी लहानपणापासूनच्या आपल्या बहिणींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मोठ्या बहिणींनी मला लहानपणापासून खूप सांभाळले आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच पंकजाताईंसोबत रक्षाबंधन साजरे केले होते, मात्र पंकजाताई सध्या पुण्यात असून मी मतदार संघात आहे; त्यामुळे आज तो योग जुळून आला नाही. असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, युवक नेते मिथिलेश केंद्रे यांसह आदी उपस्थित होते. राज्य सरकारने शेतकरी सुद्धा लाडका केला
आम्ही राज्यात रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली विरोधकांना तोंडावर पाडत या योजनेतून राज्यातील लाखो बहिणींना लाभ मिळाला. लाडक्या बहिणींच्या सोबतीला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमातून लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाली त्यातून भाऊ देखील लाडका झाला. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना एक रुपयात विमा, कापूस सोयाबीन भावांतर योजनेतून प्रती हेक्टरी 5000 मदत, साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंपांचे जुने विज बिल माफ करून पुढील शंभर टक्के मोफत वीज देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने शेतकरी सुद्धा लाडका केला. सरकारने घेतलेले निर्णय महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार
या तीन मोठ्या निर्णयामुळे राज्यात लाखो सर्वसामान्य घटकांना थेट लाभ मिळायला लागल्याने महायुतीसाठी हे गेम चेंजर ठरणार असून या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार पुन्हा एकदा निर्विवादपणे सत्तेत येईल, असा विश्वास यावेळी धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंकजा व डॉ.प्रीतम मुंडे यांना दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा दरम्यान आमदार पंकजा मुंडे व माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजा आणि प्रीतम मुंडे या दोघींनीही धनंजय मुंडे यांना नुकतेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी औक्षण करून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच दोघीही उमेदवारी अर्ज भरण्यासही उपस्थित होत्या.