धनंजय मुंडेंचा पाय खोलात, पीक विमा घोटाळ्याची केंद्र सरकारकडून चौकशी:सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर शिवराजसिंह यांची लाेकसभेत घोषणा
शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत मांडला. त्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली. आधीच वाल्मीक कराडचे खंडणी प्रकरण, सरपंच खूनप्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी डीपीसीत मंजूर केलेल्या ८०० कोटींच्या कामांच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. आता केंद्राच्या चौकशीचा ससेमिराही धनंजय मुंडेंच्या मागे लागला आहे. आरोप खोटे, खरेदी नियमानुसारच : मुंडे धनंजय मुंडे यांनी दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले. त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशाराही त्यांनी दिला. मुंडे म्हणाले, ‘कृषी विभागाने शासनाच्या संकेतास अनुसरून खरेदी केली. डीबीटी वितरणात सदर वस्तू वगळून खरेदीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची परवानगी घेतली. नॅनो युरिया व डीएपी खताचे दर देशात वेगवेगळे आहेत. त्यामुळे तफावत येते. बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाची आम्ही एक वर्ष वॉरंटी घेतली होती. चारही प्रकारच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे दोन वेळा मुदतवाढही दिली होती. ज्या काळात हे सर्व घडले त्या काळामध्ये कापसाचे भाव पडलेले होते शेतकरी कापूस विकायला तयार होत नव्हते. मात्र घरामध्ये पडून राहिल्याने कापसाबरोबरच शेतकरी कुटुंबांना सुद्धा संसर्गजन्य आजाराची लागण होऊ लागल्याने कापूस भरून ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या कंपनीकडूनच संबंधित बॅगा खरेदी केल्या. अंजली दमानिया यांनी आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर अनेक आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले. दमानियांचाही आरोप : कृषी साहित्य खरेदीत धनंजय मुंडेंचा २४५ कोटी रुपयांचा घोटाळा शेतकऱ्यांसाठीच्या योजनेतील नियम धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असतांना २४५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. खुल्या बाजारातील वस्तूंचे दर आणि कृषी खात्याने खरेदी केलेल्या दरात मोठी तफावत असल्याचा आरोपच दमानिया यांनी कागदपत्रासंह केला. १२ मार्च आणि १५ मार्च २०२४ असे जीआर कृषी खात्याने काढले. त्याअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी केली आहे. या वस्तूंची खरेदी बाजारभावाच्या तुलनेत तिप्पट दराने खरेदी केला. तसेच ही खरेदी टेंडरची प्रक्रिया न राबवता केली .तसेच कच्चा माल विकत घेण्यासाठी सर्व कंपन्यांना आधीच पैसे सुद्धा देण्यात आले. असे एकूण सुमारे २४५ कोटींचा हा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे मुंडेंच्या घोटाळ्याचे पुरावे दाखवल्यानंतर तरी मुंडे यांनी राजीनामा द्यावा. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी यावेळी केली आहे.
अशी केली जादा दराने खरेदी