धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिसांची बैठक:खासदार बजरंग सोनवणे यांचा गंभीर आरोप, आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची केली मागणी
मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याची बैठक झाली असल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या पूर्वी आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता. खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाली असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मी पहिल्याच बाईटमध्ये मीडियाला म्हटले होते की, तिसऱ्या आरोपींचं कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागत आहे का बघा, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होते. आज हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचे सापडले. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडे गेलो, तिकडे गेलो. खंडणीच्या आरोपीवर 11 तारखेला गुन्हा दाखल झाला. मात्र, 12 तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलिस अधिकारी यांची बैठक झाली, असे म्हणत सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर व पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी आणि पोलिस अधिकारी यांची भेट झाली. म्हणजे पोलिसाला तिथे बसवून तो निघून गेला का? असा सवाल देखील बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. बजरंग सोनवणे यांनी थेट नाव जरी घेतले नसले तरी देखील माजी पालकमंत्री म्हंटले तर धनंजय मुंडे हेच बीडचे माजी पालकमंत्री आहेत. त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करा बजरंग सोनवणे म्हणाले, 12 डिसेंबरला बीडचे पालकमंत्री व खंडणीखोर आरोपीची पोलिस अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. विशेष म्हणजे वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलिस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय? असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. 31 डिसेंबरला अटक होईपर्यंत 21 दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केले जात नाही, असेही सोनवणे म्हणाले. एसआयटीतील नावे आरोपीच्या सांगण्यावरून एसआयटीमधील नावे देखील आरोपीच्या सांगण्यावरून घेतली गेली असल्याचा सुद्धा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बजरंग सोनवणे म्हणाले, एसआयटी कधी नेमली गेली हेही तुम्ही पाहा, ज्या दिवशी आरोपी पोलिसांना शरण येतो. त्याच दिवशी एसायटी गठीत केली जाते, एसआयटीच्या टीमची नावे समोर येतात. म्हणजे, आरोपीला जे हवे ते पोलिस अधिकारी, कर्मचारी एसआयटीमध्ये घेतले गेले. राज्यपालांकडून एसआयटीतील अधिकाऱ्यांची नावे निश्चित केल्यानंतरच आरोपी पोलिसांना अटक झाला.