डिजिटल अटक, सायबर गुन्ह्यांविरुद्ध दक्षता आवश्यक- डॉ. निमिष कपूर:आयआयएमसीत फॅक्ट चेकिंग व डेटा वेरिफिकेशनवर कार्यशाळा
अमरावती डिजिटल अटक, ऑनलाइन बँकिंग फसवणूक या घटना प्रसारमाध्यमांमध्ये गाजत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी अशा सायबर गुन्ह्यांविरुद्ध केवळ स्वतःलाच सजग करून चालणार नाही तर आपले मित्र, कुटुंबीय आणि समाज यांनाही त्याविषयी जागरूक केले पाहिजे, असे मत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सायन्स फिल्म फेस्टिव्हल विभागाचे प्रमुख डॉ. निमिष कपूर यांनी आयआयएमसीत व्यक्त केले. भारतीय जन संचार संस्थान (आयआयएमसी) पश्चिम क्षेत्रीय परिसरात तथ्य आणि विदा तपासणी (फॅक्ट चेकिंग एंड डेटा वेरिफिकेशन) या विषयावर सोमवार ११ रोजी सकाळी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांच्यासह डॉ. विनोद निताळे, डॉ. आदित्य मिश्रा, चैतन्य कायंदे, जयंत सोनोने, निकिता वाघ उपस्थित होते. डॉ. निमिष कपूर पुढे म्हणाले की, माहिती व संवाद क्रांतीने जीवनात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, समाजकंटकांनी त्याचा गैरवापर करून मानवी जीवनात अनेक संकटे निर्माण केली आहेत. धोक्यांच्या भीतीने उपलब्ध सुविधा सोडता येत नाहीत, तर हे धोके तांत्रिक ज्ञान आणि दक्षता घेऊन दूर करता येतात असे ही ते यावेळी म्हणाले . कार्यशाळेत डॉ. कपूर यांनी फेक न्यूजच्या समस्येचा संदर्भ देत विदा (डेटा) तपासणीच्या अनेक ऑनलाइन साधनांची माहिती या वेळी विद्यार्थ्यांना दिली. पत्रकारितेत विदाचे महत्त्व सांगून त्यांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने विदाचा अर्थ लावणे, कथा तयार करणे आणि आलेखाद्वारे कथा सुलभ करण्याचे तंत्र आदी विषयी उदाहरणासह विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आदित्य मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंकाने केले. याप्रसंगी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे राजेश झोलेकर, संजय पाखोडे, नुरुज्जमा शेख, भूषण मोहोकर, मंदा पवार, नंदा तुप्पट यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी