दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय?:मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? आदित्य ठाकरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय?:मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? आदित्य ठाकरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण

तनिषा भिसे या गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, वेळेवर उपचार न भेटल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात देखील मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. आदित्य ठाकरेंची पोस्ट काय? ज्या संस्थेने प्रसूतीसाठी एका महिलेकडून 10 लाख रुपये मागितले होते, त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्ट आणि संस्थेविरोधात मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे, असे आदित्य ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. आदित्य ठाकरेंचा पुणेकरांनाही सवाल गर्भवती महिलेचे नातेवाईक ही खंडणी देण्यास असमर्थ ठरल्याने तिचा मृत्यू झाला. पण प्रश्न असे आहेत की, अंतर्गत समितीने अनामत रक्कम मागितल्याचा आरोप फेटाळला, तरी काल एका डॉक्टरने कबूल केले आणि पदाचा राजीनामा दिला. रुग्णाला न वाचवता स्वतःचा बचाव करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी रचणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर विश्वास कसा ठेवू शकतात? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतो? जर रुग्णालय खंडणीची (डिपॉझिट) मागणी करत असेल, तर रुग्णालयाच्या कर आणि महापालिकेच्या देयकांचे काय? ते देयके कोट्यवधींमध्ये आहे! या यंत्रणा रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्टी आणि एजन्सींचे दरवाजे ठोठावतील का? हे रुग्णालय कोण चालवत आहे आणि ते इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतो? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारले आहेत. थकीत करावरून सुप्रिया सुळेंचाही सवाल दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय असंवेदनशील आहे. भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाला जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुले यांनी केली. महानगर पालिकेवर संताप व्यक्त करत रुग्णालयाने थकवलेला 27 कोटींचा कर का वसूल करण्यात आला नाही? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. पालिकेकडे सर्वसामान्य नागरिकांनी कर थकवला, तर कर वसूली साठी त्यांच्या घरामोर बॅंड वाजवला जातो. मात्र, दवाखान्याने एवढी मोठी रक्कम थकवून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणी पालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. हे ही वाचा… पुणे मनपाची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस:उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्याची ताकीद; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर प्रशासन अलर्ट मोडवर दीनानाथ रुग्णालयाशी संबंधित तनिषा भिसे गरोदर माता मृत्यू प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे महापालिकेने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास मनाई केली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर प्रथम उपचार करा त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा… मंगेशकरांना जमीन दान दिल्याचा पश्चाताप:दीनानाथ रुग्णालयाला जमीन देणाऱ्यांना खंत; जागा मालकाला लाखोंचे बिल आकारल्याचा दावा पुणे – तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडल्यानंतर आता या रुग्णालयाला जमीन दान देणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याने आपल्या निर्णयावर खंत व्यक्त केली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणामुळे मी पुन्हा – पुन्हा इतिहासात जात आहे. पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर…?, अशी जाहीर खंत खिलारे कुटुंबातील सदस्या डॉक्टर नयना सोनवणे -खिलारे यांनी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment