दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणार चौकशी:आरोग्य मंत्र्यांचे आदेश; सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, पतित पावन, गुलाबो गँगची निदर्शने

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणार चौकशी:आरोग्य मंत्र्यांचे आदेश; सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, पतित पावन, गुलाबो गँगची निदर्शने

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्राशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोरही आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यांना तपासूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून आज रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. याच सोबत भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. रुग्णालयातील प्रशासनाची चौकशीनंतर याचा अहवाल आरोग्य खात्याला देण्यात येणार आहे. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयांनी घ्यावायच्या काळजीबद्दल नियमावली तयार करण्यात येणार असल्याची देखील माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. डॉक्टरांनी कोणत्याही आरोग्य सेवेला नाकारू नये. एका बाजूला जुळ्या बाळांचा जन्म झाला तर दुसऱ्या बाजूला आईचे निधन झाले हे दुर्दैवी आहे, असेही आबिटकर म्हणाले. शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यावर चिल्लर फेकले दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेना ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गटाने जोरदार आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप या रुग्णालयावर लावण्यात येत आहे. तसेच रुग्णालयाच्या या असंवेदनशील कारभारामुळेच महिलेचा जीव गेला असल्याचे म्हटले जात आहे. या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रुग्णालयातील अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांच्यावर चिल्लर फेकण्यात आले. जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार असल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी – रुग्णालय अधिकारी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यावर तसेच शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन केल्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. तसेच दीनानाथ रुग्णालय योग्य ती माहिती प्रशासनाला देणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी 10 लाख रुपये मागीतल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेससह संघटनांची आंदोलने युवक कॉंग्रेस देखील दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ रुग्णालयाच्या पाटीवर काळे फासले. तसेच आमच्यात गांधी आहेत आणि भगत सिंह पण आहेत. उद्या आमच्यातील भगत सिंह जागा होईल असा इशाराही युवक कॉंग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच रुग्णालयातील डॉ. केळकर कुठे आहेत, त्यांनी समोर यावे, असे आव्हानही यावेळी कार्यकर्त्यांनी केले. पतित पावन संघटना, गुलाबो गँग, बहुजन भीमसेना संघटनेच्या वतीनेही दीनानाथ रुग्णालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशीचे आदेश – अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती. गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू:मंगेशकर हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना रद्द करा, सरकारने जमीन ताब्यात घ्यावी- संभाजी ब्रिगेड दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल धन दांडग्यांचे हॉस्पिटल आहे. श्रीमंताशिवाय सामान्य माणसाला तिथे उपचार मिळत नाहीत. तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिला उपचाराअभावी मृत्यू झाला. दोन बाळ पोरगी झाली. याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे.त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चा धर्मादाय परवाना रद्द करून सर्व जमीन सरकारच्या ताब्यात घ्यावी व हॉस्पिटल बंद करावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असे मत महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे. हेही वाचा नेमकी घटना काय? भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत असताना त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यावेळी अडीच लाख रुपये सध्या आहेत उर्वरित रक्कम देतो असे सांगूनही प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भिसे कुटुंबाने गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला. मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी – आमदार अमित गोरखे या घटनेवर भाजप आमदार अमित गोरखे म्हणाले, आज एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. माझे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी यांना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे नेले असता रुग्णालयाने 10 लाख रुपये भरण्यास सांगितले. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असताना ही प्रवेश नाकारला. त्यानंतर मंत्रालयाकडून संपर्क होऊनही हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय झुगारला. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दुसऱ्या हॉस्पिटलला जावे लागले. तिथे उपचारानंतर दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला, पण दुर्दैवाने त्या मातेचा मृत्यू झाला. पुढे बोलताना अमित गोरखे म्हणाले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. मात्र इथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात, हे अत्यंत संतापजनक आहे. अशा अनेक तक्रारी या हॉस्पिटलच्या विरुद्ध आल्या आहेत. या अन्यायाविरोधात मी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची असंवेदनशीलता- सुषमा अंधारे या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका करताना म्हटले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात भरती करून घ्यावे यासाठी मंत्रालयातून फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयला जराही पाझर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतका निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकते जेव्हा सत्ताधाऱ्यांचे राजछत्र भक्कम पाठीशी असते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल असंख्य तक्रारी येऊन सुद्धा दिमाखात उभे आहे. रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारी प्रीव्हीलेज सत्ताधाऱ्यांमुळे आहे हे वेगळे सांगायला नको. परंतु प्रश्न हा उरतो की सत्ताधारी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जिवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्या-मुंग्यासारखे चिरडून टाकायलाही मागेपुढे बघणार नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment