दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राजकीय पडसाद:अशा चुकीला माफी नाही, कोणालाही सोडले जाणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राजकीय पडसाद:अशा चुकीला माफी नाही, कोणालाही सोडले जाणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गुरुवारी घडलेल्या घटनेवर आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. पैशांअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने महिलेचा जीव गेल्याची घटना घडली होती. यानंतर आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयावर कारवाईचे आदेश दिले असून पोलिस आज रुग्णालय प्रशासनाची चौकशी करणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ही अतिशय मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते, असे म्हटले आहे. अशा चुकीला माफी नसते – चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आंदोलन करणे हा आपला अधिकार आहे. पण जी चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल कारण कोणाचाही परिवार असो पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे, असे नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला अशी सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे ही एक प्रकारची मुघलशाही आहे. कोणाची काय चूक आहे ते तपासले पाहिजे. ही गंभीर घटना असून याची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आम्ही सर्वांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि कोणालाही आम्ही सोडणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. रुग्णाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मागण्यात आले होते, यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही कोणालाही सोडणार नाही. अजित पवार आहेत, आम्ही आहोत आणि जे काही झाले आहे यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. या घटनेमुळे जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अशा बाबी आम्ही माफ करणार नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो आहे. या रुग्णालायला आम्ही खूप काही दिले आहे. सरकार म्हणून आम्ही रुग्णालयाच्या पाठीशी उभे आहोत. पण रुग्णालयातील प्रशासन कर्मचारी मुघलशाही करत असतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. हिमंत असेल तर रुग्णालयावर कारवाई करावी – संजय राऊत या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील संतप्त टीका केली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हिमंत असेल तर रुग्णालयावर कारवाई करावी. भिसे कुटुंब ज्या ज्या डॉक्टरांचे नावे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. हिमंत असेल तर. तुमची हिमंत फक्त विरोधकांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापूर्तीच आहे. तुमच्यात काय दम आहे. ज्या दिवशी सत्ता तुमच्याकडे नसेल, तेव्हा रस्त्यावर कावळा सुद्धा तुमच्याकडे बघणार नाही आणि काव काव करणार नाही. त्यांनी रुग्णालयावर कारवाई करून दाखवावी, माझे आव्हान आहे त्यांना. ज्या बाईंचा काल मृत्यू झाला त्या बाईंचा शाप लागेल तुम्हाला, असे संजय राऊत म्हणाले. मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल सुरू आहेत – संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, आधी पैसे जमा करा मग आम्ही उपचार करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल सुरू आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे धर्मदायच्या नावाखाली नोंदणी केली आहे. म्हणून पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे. या या वर्षात किंवा दोन वर्षात किती गरिबांचा उपचार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणे महत्त्वाचे आहे. चौकशीचे आदेश दिले – माधुरी मिसाळ भाजप नेत्या व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. माधुरी मिसाळ म्हणाल्या, आम्हाला याची कालच माहिती मिळाली होती आणि आम्ही चौकशीचे आदेशही दिले आहेत. बरेचसे धर्मदाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाहीत, असे काही अंशी खरे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी एक आरोग्यदूत किंवा एक कमिटी तिथे स्थापन करण्याची गरज आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment