दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच ठपका:रुग्णाला तत्काळ दाखल करून न घेणे ही चूकच, चौकशी समितीचा अहवाल

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. पैशांसाठी गर्भवती महिलेला दाखल करून न घेतल्याचा गंभीर आरोप या रुग्णालयावर करण्यात येत आहे. पुण्यातील भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याने हा आरोप केला जात आहे. आता या प्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीसाठी एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून या अहवालात समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच ठपका ठेवला आहे. रुग्णाला दाखल करून न घेता अनामत रक्कम मागण्याचा प्रकार नर्सिंग होम अॅक्टमधील चुकीचा असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालय अडचणीत आल्याचे दिसत आहे. तनिषा भिसे मृत्यु प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्या समोर पुणे पोलिस आयुक्तलयात सोमवारी सादर करण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणात राज्य शासनाने पाच सदस्यांची एक समिती नेमली होती. यात पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ.राधाकृष्ण पवार, सहायक संचालक डॉ.प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले, पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.निना बोराडे, आरोग्य सेवा पुणे मंडळाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कांबळे यांचा समावेश होता. या समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात रुग्णाला तत्काळ दाखल करुन घेतले नाही, ही चूक असल्याचे स्पष्ट केले आहे. अहवालात नेमके काय म्हटले? आरोग्य सुविधा ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. नागरिकांना धर्मदाय संस्थांनी चांगल्याप्रकारे आरोग्य सुविधा देणे अपेक्षित असताना देखील तशी नियमावली आहे. परंतु दीनानाथ मंगेशकर मध्ये रुग्णाला वेळेत उपचार देण्यास टाळाटाळ झाल्याने रुग्णाचा नंतर मृत्यु झाला आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात झालेली चर्चा ही गोपनीय असते परंतु रुग्णालयाने स्वत:ला वाचविण्याकरिता जो अंर्तगत चौकशी अहवाल सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिध्द केला ती बाब चुकीची आहे. रुग्णाच्या अनेक गोपनीय गोष्टी त्यामुळे जाहीर झाल्या असल्याने याबद्दल त्यांना कडक शब्दात समज देण्यात येईल. हा अहवाल रुग्णालयाने समिती समोर मांडणे अपेक्षित होते.