जिल्ह्यात अवघ्या 3 महिन्यांमध्ये वाढले 23 हजार 319 नवमतदार:उमेदवारांनीही प्रचारतंत्र बदलत तरुणांकडे वळवला मोर्चा

जिल्ह्यात अवघ्या 3 महिन्यांमध्ये वाढले 23 हजार 319 नवमतदार:उमेदवारांनीही प्रचारतंत्र बदलत तरुणांकडे वळवला मोर्चा

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत नव्याने नोंद झालेल्या तरुण मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक ही तरुणांभोवती केंद्रीत झाली असून, बहुतेक उमेदवारांनी त्यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. निवडणूक यंत्रणेच्या मते या वेळच्या मतदार यादीतील तरुणांची संख्या ४६ हजार ९२० एवढी झाली असून, ही वाढ आतापर्यंतच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी होणारी वाढ अवघी एक टक्क्यांपर्यंत असायची, ती यावेळी १.८४ टक्के झाली. या वाढीमुळे अमरावती जिल्ह्याला तरुण मतदारांचा जिल्हा अशी नवी ओळख मिळाली असून, आठही मतदारसंघातील तरुणांची संख्या लक्षणीय ठरली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी नवमतदारांचा आकडा त्यावेळच्या एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अवघा अर्धा टक्का होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकी वेळी तो ०.८१ टक्के झाला, तर आता तो १.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या संयुक्त अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदार २५ लाख ४६ हजार ४५८ झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांची संख्या ४६ हजार ९२० असून १८ ते ३९ वयोगटातील मतदारांचा आकडा हा ५ लाख ५६ हजार ८२२ एवढा आहे. तरुण मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील आठही मतदारसंघाचे प्रचारतंत्रही बदलले आहे. या बदलाचा फरक अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात विशेषत्वाने जाणवत आहे. उमेदवारांनी आपल्या प्रचारात आयटी हब, बेरोजगारी, मोफत शिक्षण, रोजगार आदी मुद्द्यांना स्थान दिले आहे. प्रचाराच्या वाहनांवर या योजनांचे फ्लेक्स, बॅनर दिसून येत आहेत. याशिवाय १६ हजार ७९६ दिव्यांग मतदारही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे विविध योजना राबवण्यात आल्या. महाविद्यालयांमध्ये विशेष सभांचे आयोजन केले. विद्यापीठाची रासेयो आणि एनसीसी तसेच स्काऊट गाइडचे सहकार्य घेत नवमतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे १८ ते ३९ वयोगटातील मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लोकसभेवेळी २३,३१९ युवांची नोंद लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर साधारणत: पाच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत असली, तरी या निवडणुकीची मतदार यादी महिनाभरापूर्वीच अंतिम करण्यात आली. त्यासाठी ऑगस्टपासून पुनरिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या दरम्यान (ऑगस्ट ते ऑक्टोबर) वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या ४६ हजार ९२० तरुणांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली. याउलट लोकसभेवेळी झालेली नोंद ही केवळ २३ हजार ६०१ एवढी होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात २३ हजार ३१९ आणखी नव्या नवमतदारांची त्यात भर पडली आहे. राज्यात पहिल्या पाचमध्ये अमरावती ^तरुण आणि नवमतदारांच्या संख्येत या वेळी अमरावती जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. परिणामी हा जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये समाविष्ट झाला आहे. नवमतदारांची संख्या ४६ हजार ९२० वर पोहोचली आहे. ही वाढ लक्षणीय आहे. -प्रवीण देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment