दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पाणवठ्यांत सोडले पाणी; मुख्य उपवनसंरक्षक सुवर्णा मानेंकडून दखल

प्रतिनिधी | अजिंठा जागतिक वन दिनानिमित्त अजिंठा वन विभागाने जंगलात मोठे बॅनर लावून वन दिन साजरा केला. मात्र, जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नव्हते. रविवारी (दि. २३) ‘दिव्य मराठी’त याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच मुख्य उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी तातडीने अजिंठा वन विभागाला पाणवठ्यांत पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. निसर्गप्रेमींनी वन विभागाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्याच्या दिवसांत नियमित पाणी सोडण्याची मागणी केली. केवळ फोटो सेशनसाठी नव्हे, तर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल यांनी जबाबदारीने काम करावे, असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले. मुख्य उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले की, पाणवठ्यांत पाणी सोडण्याच्या सूचना मी पाच दिवसांपूर्वीच दिल्या होत्या.