दिव्य मराठी विशेष:गंगोत्री धामला माता गंगेची पालखी निघताना मुखबा गाव रडले, नवीन कपडे अन् दागिनेही दिले

उत्तराखंडची चारधाम यात्रा बुधवारपासून सुरू होत आहे. सर्वात प्रथम गंगोत्री धामचे दरवाजे सकाळी १०:३० वाजता उघडतील आणि यमुनोत्री धामचे दरवाजे सकाळी ११:५५ वाजता उघडतील. पहिल्या दिवशी २५-२५ हजार भाविक येथे दर्शन करतील. चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत २१ लाख नोंदणी झाल्या आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी दुपारी, माता गंगोत्रीचे शीतकालीन निवासस्थान असलेले मुखबा गाव आणि माता यमुनोत्रीचे खरसाली गावात सर्वांच्या डोळ्यांत पाणी होते, कारण येथे दोन्ही देवींची कन्यांप्रमाणे पूजा केली जाते. गंगोत्री मंदिरात पूजा करण्याचा अधिकार फक्त सेमवाल वंशातील पुजाऱ्यांना आहे. सकाळी, मुखबात माता गंगोत्रीच्या चल मुखाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. श्री सुप्त व गंगा अष्टक पूजन करण्यात आले. या वेळी महिलांनी गढवाली आणि जौनसारी बोलीभाषेत मंगलगीते गायली. मग मातेला नवीन कपडे, दागिने आणि आवश्यक वस्तू देण्यात आल्या. दुपारी १२:३० वाजता, शंखनादात पालखी १९ किमी अंतरावरील गंगोत्रीकडे रवाना झाली. गंगा पुरोहित सभेचे निमंत्रक अशोक सेमवाल म्हणाले की, दरवर्षी गंगोत्री मुख्य मंदिरात पूजेसाठी १५ पुजारी नियुक्त केले जातात.
यमुनोत्री: मुलीला ५ किमी सोडायला संपूर्ण गाव जाते बुधवारी सकाळी ७ ला खरसालीहून यमुनोत्री धामला माता यमुनाला घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. स्तोत्राने मातेला जागृत केले जाईल. सकाळी ९ ला चल मुखाची मूर्ती बाहेर आणली जाईल. लोक मुलगी यमुनेला यमुनोत्री धामला सोडण्यासाठी ५ किमी पायी जातील.