दिव्य मराठी अपडेट्स:आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून; तर पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुणे – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 18 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होत आहे. दुपारी 3 वाजता या स्वरयज्ञाला प्रारंभ होईल. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुलात 18 ते 22 डिसेंबरदरम्यान हा 70 वा महोत्सव होणार आहे. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी यांनी ही माहिती दिली. सुरुवातीला उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होईल. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व सुपुत्री शाश्वती चव्हाण- झुरुंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करतील. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 2025-26 या वर्षासाठीच्या प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेला 18 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. आरटीईच्या पोर्टलवर शाळांना नोंदणी करता येणार आहे. आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विधान परिषद सभापतिपदावर भाजपचा दावा, गुरूवारी निवड मुंबई – मंत्रिमंडळात ज्या आमदारांना स्थान देता आले नाही, त्यांना खुश करण्याचे काम आता महायुतीने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक 19 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. विधानसभा अध्यक्षापाठोपाठ या पदावरही भाजप दावा करणार आहे. त्यात राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेतेही लॉबिंग करत आहेत. शिंदेसेनेच्या नीलम गोऱ्हेही इच्छुक आहेत. त्या उपसभापती आहेत. मात्र, दोन वर्षांपासून सभापतिपद रिक्त असल्याने त्याच गोऱ्हे सभागृहाचे कार्यवाहीचे संचालन करत आहेत. मंगळवारी निवडणुकीची तारीख झाल्यावर उद्धवसेनेचे अनिल परब यांनी गोऱ्हेंवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यांची सभापतिपदी निवड करणे कायदेशीर आहे का? त्यावर उद्या निर्णय जाहीर करण्याचे गोऱ्हेंनी आश्वासन दिले. भाजपने सुरू केली आ. रणजितसिंह मोहिते यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया साेलापूर – भाजपचे आमदार असूनही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा, माळशिरस विधानसभेला खुलेआमपणे शरद पवार गटाचा प्रचार करत तुतारी वाजवली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी माळशिरस विधानसभेतील भाजपचे पराभूत उमेदवार, माजी आमदार राम सातपुते यांनी लावून धरली आहे. त्यानुसार भाजपने शिस्तभंगाचा ठपका ठेवून मोहिते पाटील यांना नोटीस बजावली आहे. उत्तर देण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी 16 डिसेंबर राेजी ही नाेटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणावर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तेे उपलब्ध होऊ शकले नाहीत. 2019मध्ये रणजितसिंहांसह माेहिते-पाटील कुटुंब भाजपमध्ये गेले हाेते. आता ते पदाचा राजीनामा देणार का, याविषयी उत्सुकता आहे. ग्रामीण भागात 38 टक्के लोक वापरतात यूपीआय मंुबई – डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआय देशाच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातही अधिक लोकप्रिय होत आहे. संशोधन संस्था ईवाय आणि इंडस्ट्री बॉडी सीआयआयच्या सर्वेक्षण अहवालानुसार, ग्रामीण आणि निमशहरी भागातील 38% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर करतात. 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये पेमेंटचे साधन म्हणून यूपीआय सर्वात लोकप्रिय आहे. तथापि 19% उत्तरदाते अजूनही पूर्णपणे रोखीवर अवलंबून आहेत. याशिवाय 11% लोकांना यूपीआय अजिबात आवडत नाही. मॅजिकविन पोर्टलप्रकरणी पुणे, मंुबईत ईडीच्या धाडी नवी दिल्ली – टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे बेकायदा प्रसारण आणि बेटिंग रॅकेट चालवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मॅजिकविन पोर्टलच्या पुणे,मंुबई आणि दिल्लीस्थित ठिकाणांवर धाडी टाकल्या. मॅजिकविन हे पोर्टल काही पाकिस्तानी नागरिक चालवत होते. याप्रकरणी 10 ते 12 डिसेंबरदरम्यान ईडीने धाडी टाकल्या. अहमदाबादच्या सायबर क्राइम विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ईडीने 30 लाख रुपयांच्या बँक डिपाॅझिटवर टाच अाणली असून काही आक्षेपार्ह, संशयास्पद दस्तएेवजही जप्त केले अाहेत. गेमिंग पोर्टलच्या नावाखाली मॅजिकविन वेबसाइटवर सर्रास सट्टेबाजी सुरू होती पाकिस्तानी नागरिकाचे हे पोर्टल दुबईत बसून काही भारतीय चालवत होते, असे तपासात निष्पन्न झाले. अमृतसर पोलिस ठाण्यावर गँगस्टरचा हँडग्रेनेड हल्ला अमृतसर – पंजाब मधील पोलिस ठाणी गँगस्टर आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. सोमवारी पहाटे 3.15 वाजता अमृतसरच्या ठाणे इस्लामाबादवर हँडग्रेनेड फेकण्यात आले. याचा स्फोट एवढा जबरदस्त होता की, जवळपासच्या इमारतीची तावदाने फुटली, भिंतीवरील टाइल्सनाही तडे गेले. गुंडांच्या काही टोळ्या हे हल्ले करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त गुरप्रीतसिंह भुल्लर यांनी दिली. हल्ल्यात पोलिस ठाण्याची हानी नाही. मात्र इंग्लंडमधील जीवन फौजी या गँगस्टरने ठाणे इस्लामाबादवरील हल्ल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कुख्यात जीवन फौजी हा डेरा बाबा नानकमधील शहजादा कला गावाचा रहिवासी आहे. दिल्लीमध्ये शाळांना 9 दिवसांत 5व्यांदा धमकी नवी दिल्ली – दिल्लीतील अनेक शाळांना मंगळवारीही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. मात्र, चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. या आठवड्यातील ही दुसरी तर नऊ दिवसांतील पाचवी घटना आहे. सोमवारी 20 शाळांना धमकीचे ईमेल आले होते. पोलिस तपास करत आहेत. या वर्षी विमानांना 994 बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. अमली पदार्थ प्रचारावरून ओटीटीला केंद्राचा इशारा नवी दिल्ली – केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना ड्रग्जशी संबंधित सामग्रीचा प्रचार करण्याबाबत इशारा दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. यात अमली पदार्थांचा वापर दर्शवणाऱ्या कार्यक्रमांसाठी अस्वीकरण जारी करण्याचा सल्ला दिला. आता इन्स्टाग्रामवर डीएम शेड्यूल करू शकता वॉशिंग्टन – इन्स्टाग्राम वापरकर्ते आता डायरेक्ट टेक्स्ट मेसेज (डीएम) शेड्यूल करू शकतात. यासाठी वापरकर्त्याला चॅटमधील सेंड बटण बराच वेळ दाबून धरून ठेवावे लागणार आहे. सध्या, 29 दिवस आधीपर्यंत संदेशांचे नियोजन केले जाऊ शकते. चॅटमधील नोटिफिकेशनवर टॅप करून गरज पडल्यास तुम्ही ते बदलू शकता, असे इन्स्टाग्रामने निवेदनात म्हटले आहे. गुगल व्हिडिओ मेकिंग एआय टूल ‘व्हीअाे2’लाँच करणार सॅन फ्रान्सिस्को – टेक दिग्गज गुगलची एआय लॅब डीपमाइंडने ‘व्हीओ2’ नावाचे नवीन व्हिडिओ-जनरेटिंग एआय टूल लॉन्च केले आहे. एआय व्हिडीओ बनवणाऱ्या एआय टूल सोरापेक्षा व्हीओ2 चांगले आणि अधिक सक्षम आहे. व्हीओ 2 चा हजार रिझोल्यूशनमध्ये 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ क्लिप तयार करू शकते. सोरा फक्त 1080 पी आणि 20 सेकंदांपर्यंत व्हिडिओ बनवू शकते. सध्या गुगलच्या व्हिडिओ-एफएक्समध्ये व्हीओ2 वापरला जात आहे. व्हिडिओ 720 पी आणि 8 सेकंद लांबीपर्यंत मर्यादित आहेत. डीपमाइंडचे उपाध्यक्ष एली कॉलिन्स म्हणाले की, व्हीओ2 गुगलच्या व्हर्टेक्स एआय प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाईल जेव्हा ते मोठ्या प्रमाणावर वापरासाठी तयार होईल. व्हीओ2 टेक्स्ट आणि छायाचित्रांतून व्हिडिओ बनवू शकतो. हे योग्य मोशन, फ्लूड डायनेमिक आणि सिनेमॅटिक इफेक्ट्स सांभाळू शकते.