डॉ. वर्षा फलके-पवार ‘वुमन रिसर्च सायंटिस्ट’ पुरस्काराने सन्मानित:सुपिकता हरवलेल्या जमिनीतून उत्तम पीक काढण्याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे सुपिकता हरवून बसलेल्या जमिनीवर प्रक्रिया करून त्यामध्ये अधिकाधिक पीक कसे काढता येईल याबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन केलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.वर्षा फलके-पवार यांना नुकतेच ‘वुमन रिसर्च सायंटिस्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. वर्षा यांना सूक्ष्मजीवशास्रातील उत्कृष्ट संशोधनाबद्दल हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ. वर्षा या सध्या सिल्लोड येथील प्रगती महाविद्यालयात प्राचार्य आणि पोस्ट डॉक्टरेट रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, संशोधन, सामाजिक कार्य व पर्यावरण संवर्धनासारख्या महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. डॉ. वर्षा यांनी संशोधनावर आधारित अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च पब्लिकेशनस् तसेच रिसर्च पेटंटस् मिळवलेले आहेत. राष्ट्रीय पातळीवर सन्मान वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असून, जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खताच्या अतिवापरामुळे खारावलेल्या जमिनीवर प्रक्रिया करून त्यामध्ये अधिकाधिक पीक कसे काढता येईल याबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन डॉ. वर्षा यांनी केलेले आहे. या संशोधनाकरिता राष्ट्रीय पातळीवर त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच या विषयावर त्यांनी पेटंट सुद्धा मिळवले आहे. उराल युनिव्हर्सिटी रशिया, इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कंबोडिया, टारलॅक एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, फिलीपाईन्स, नॅशलन चंग चेंग युनिव्हर्सिटी,तैवान, मायक्रोबिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव-शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत जैवसंशोधन आणि जैवअर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान संशोधनातील नवोपक्रम: आव्हाने आणि पद्धती’ या विषयावर 28 ते 29 मार्च रोजी कोपरगाव शिर्डी येथे झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.वर्षा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी इंडीयन नॅशनल सायन्स अकॅडमीचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रजेश पांडे, नाशिक येथील महसुल उपायुक्त डॉ. अविनाश गजरा, उज्वला बावके-कोळसे, डॉ.अरविंद देशमुख, संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमीत कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. वर्षा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विदेशी संशोधकांची उपस्थिती विशेषतः यावेळी परदेशातून आलेले रिसर्च सायंटिस्ट ईलीना कोव्हालेवा, उराल युनिव्हर्सिटी रशिया, कंबोडिया युनिव्हर्सिटी मधून आलेल्या प्राध्यापक रिजमे टॅन, प्रिंस युनिव्हर्सिटी थायलंड येथील कृषी क्षेत्रातील जगप्रसिद्ध वैज्ञानिक प्राध्यापक सुटावट बेंजाकूल यांची देखील विशेष उपस्थिती होती.