द्राक्षाला चांगल्या भावाने यंदा बेदाणा उत्पादन २५ टक्के घटणार:निसर्गाच्या साथीमुळे द्राक्षास प्रति किलो ५० ते ७५ रुपये मिळतोय भाव

यंदाच्या हंगामात द्राक्षाला निसर्गाची साथ मिळाल्याने ५० रुपये किलोहून अधिक रुपयांचा भाव मिळत असल्याने बेदाण्याला द्राक्षांची टंचाई भासत असून त्याचा थेट फटका बेदाणा उत्पादनावर झाला आहे. यंदाचा हंगाम अवघे दोन महिनेच सुरू राहणार असून तो अंतिम टप्प्याकडे आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी उत्पादन घटण्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये बेदाण्याचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. तीन ते चार वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांसमोर नैसर्गिक संकटाचे शुक्लकाष्ठ संपण्यास तयार नव्हते. परिणामी द्राक्ष आणि बेदाण्याला अपेक्षित दरही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या निव्वळ नफ्यातही घट झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षांत यंदा द्राक्षाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीस प्राधान्य दिल्याने जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांना लागणारे दाक्षाचे मनी व कच्चामाल मिळत नसल्याने यंदाच्या हंगामात बेदाणा बनवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून व्यापारी वर्गाकडून पुढील काही काळात बेदाण्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर द्राक्षांना मिळणाऱ्या भावाचे गणित लक्षात घेता आगामी काळात ते आपला माल व्यापाऱ्यांना देऊन द्राक्षाचे पैसे करून घेण्यास आतूर झाले आहेत. भाव वाढीची चिन्हे
यंदा गेल्या चार वर्षाच्या तुलनेत द्राक्षांना अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे बेदाना उत्पादक व्यापाऱ्यांना द्राक्षाचा माल मिळणे कठीण झाल्याने आगामी काळात बेदाणा भाव वाढण्याची शक्यता आहे. -सुनील मंडलिक, ओझर
एक किलो द्राक्षासाठी सुमारे ३५ रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत खर्च येतो. एक किलो बेदाणा तयार करण्यासाठी ९० ते ११० रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे द्राक्ष बाग धरण्यापासून ते एक किलो बेदाणा तयार होण्यापर्यंत ११५ ते १४० रुपयांचा खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षी द्राक्ष बाग धरण्यापासून ते एक किलो बेदाणा तयार करण्यासाठी १०० ते १२० असा खर्च येत होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किलोसाठी १५ ते २० रुपयांनी खर्च वाढला आहे. बेदाण्यासाठी द्राक्ष कमी
यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष कमी पडू लागली आहेत. द्राक्षाला चांगले दर मिळू लागल्याने शेतकरी द्राक्ष विक्रीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे तीन महिने चालणारा हंगाम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपेल. बेदाण्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटेल असा प्राथमिक अंदाज आहे. -अमित जंजाळे, बेदाणा शेड मालक