अवैध उत्खननाच्या संशयावरून उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे टिप्पर ताब्यात:कागदपत्रे सादर करण्यासाठी एक दिवसांची मुदत
कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम शिवारात गायरान जमीनीतून अवैधरित्या मुरुम उत्खनन केल्या जात असल्याच्या तक्रारीनंतर महसुल विभागाने उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे टिप्पर गुरुवारी ता. १२ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयास कागदपत्र सादर करण्यासाठी एक दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील गायरान जमीनीवर गावकऱ्यांनी लोकवर्गणीतीतून साफसफाई करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान तयार केले होते. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून या ठिकाणी मुरुमाचे उत्खनन सुरु करण्यात आले. शासकिय यंत्रणेकडूनच मुरुम उत्खनन होत असल्याने सुरवातील गावकऱ्यांनी तक्रार केली नाही. मात्र त्या ठिकाणी खोल खड्डे होत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी महसूल विभागाला याबाबत माहिती दिली. दरम्यान, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विनोद ठाकरे, आर. डी. गिरी यांच्या पथकाने आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणावरून सुमारे ४०० ब्रास पेक्षा अधिक मुरुम उत्खनन झाल्याचे आढळून आले. त्याठिकाणी जेबीसीद्वारे उत्खनन करून टिप्परद्वारे वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावरून ठाकरे यांच्या पथकाने टिप्पर चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर मुरुम कालव्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर टाकण्यासाठी नेला जात असून मुरुम उत्खननाची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र त्याने कागदपत्रे दाखवली नसल्यामुळे या पथकाने टिप्पर ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणले आहे. दरम्यान, गायरान जमीनीवरील मुरुम उत्खनन करण्याची तहसील कार्यालयाची परवानगी व आवश्यक कागदपत्रे दाखविण्यासा्ठी प्रकल्प कार्यालयास एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या कागदपत्रांच्या तपासणीनंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तलाठी ठाकरे यांनी सांगितले.