महापुरुषात द्वंद्व उभे करण्याचे प्रयत्न चुकीचे:प्रा. डॉ.राजा दीक्षित यांचे प्रतिपादन

महापुरुषात द्वंद्व उभे करण्याचे प्रयत्न चुकीचे:प्रा. डॉ.राजा दीक्षित यांचे प्रतिपादन

महापुरुषात द्वंद्व उभे करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचे विचार वेगळे असले,मतभिन्नता असली तरी समान धागे आहेत.ते व्यक्ती नसून इतिहासाच्या साखळीचे भाग आहेत. त्यामुळे गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध नेताजी, नेताजी विरुद्ध नेहरू अशा लढाया लावण्यात अर्थ नाही ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोष महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवारी’गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले . विश्वकोष महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.राजा दीक्षित( गांधीजी आणि नैतिकता), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे (सर्वसमावेशक राष्ट्रवादाचे प्रणेते महात्मा गांधी ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी (गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद ) या मान्यवरानी मार्गदर्शन केले . युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी स्वागत केले.प्रा. शशिकला राय, प्रा.रा.ना. चव्हाण,अजय भारदे,गणेश खुटवड,तेजस भालेराव आदी उपस्थित होते. अॅड.स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.राजा दीक्षित म्हणाले,गांधीजी क्रांतीकारक होते, त्यांची क्रांती अहिंसक होती, शांततामय होती. महाराष्ट्रात गांधीजींना कमी लेखण्याचा प्रयत्न नेहमी होतो.भय आणि हिंसा हे दोनच पर्याय असतील तर मी हिंसा निवडेन,असे गांधीजींनी ‘यंग इंडिया’ मध्ये लिहिले होते.त्यांची अहिंसा ही नेभळटाची अहिंसा नव्हती,तर सबलाची, मानसिक कणखर व्यक्तींची अहिंसा होती.गांधीजींचे तत्वज्ञान हे सांगण्या, बोलण्याचे नव्हते तर कृतीचे तत्वज्ञान आहे. भांडवलशाही,शोषण पाहिल्यावर आपल्याला अपरिग्रह शब्दाचे महत्व पटते. गांधीजींचा प्रभाव भारतीय जीवनपद्धतीवर समग्र असा आहे. सत्याचा शोध घ्या, सत्य हाच माझा परमेश्वर आहे, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती. सार्वजनिक जीवनाचे नैतिकीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.त्यात गुरु- शिष्य परंपरा होती,भारतीय स्वातंत्र्य लढयाला वैचारिक बैठक होती.सत्तेच्या मोहात पडू नका,अशा सांगण्यात त्यांचे महानपण होते.आज मात्र राजकारणाची भाषा,राजकीय संस्कृती रसातळाला गेली आहे. महाराष्ट्र कुठे गेला हे पाहून मान शरमेने झुकते. आजही त्यासाठीच गांधी विचार महत्वाचा आहे.त्या विचाराकडे पाहून आपण कृतीची पावले टाकली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, भौतिक प्रगतीच्या पाश्चात्य कल्पनेला गांधींनी मर्यादा घातली. पुढील पिढीची नैसर्गिक साधन संपत्ती आपण आताच संपवणार का ? हा प्रश्न गांधीजी विचारत. पाश्चिमात्य संस्कृती विषयी गांधींजींचे आकलन आणि आक्षेप होते, म्हणूनच गांधीजी नोबेलला मुकले. भारतीय प्रेमळ आणि वैविध्य असणारा देश पूर्वी होता.तो हिंसक, क्रूर नव्हता.म्हणूनच जगभरातून लोक इथे आले.समाज टिकवण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment