इजिप्तचा सुरमा तर कॅलिफोर्नियाच्या काजूची चलती:रमजान ईद निमित्त मीना बाजार, शेवटच्या दिवशी खरेदीची धूम, अमरावतीत बाजारपेठेला ‘चार चांद’

प्रतिनिधी | अमरावती रमजान ईदच्या पर्वावर ईदच्या पूर्व संध्येला रविवारी अमरावती शहरात जवाहरगेट, जमील कॉलनी आणि ट्रान्सपोर्ट नगर परिसरात २४ मार्चपासून सात दिवसांसाठी भरलेल्या मीना बाजारात मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. सायंकाळी ६ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत या बाजारात गर्दी उसळते. इजिप्त देशातील खास सुरमा, इराण आणि अमेरिकेतील खजूर, कॅलिफोर्नियाचा काजू, बदाम आणि काश्मीरचे अक्रोड यासह विविध वस्तू, कपडे, खाद्य पदार्थ या बाजारात सर्वांचे लक्ष वेधत आहे. शहरातील जवाहर गेट ते इतवारा बाजार दरम्यान रमजान ईदनिमित्त भरलेल्या बाजारात बांगड्या, मेहंदी, काचेच्या वस्तू असे विविध साहित्य उपलब्ध आहे. या खास बाजारासाठी जवाहर गेट ते इतवारा बाजार हा मार्ग बंद करण्यात आला. जमील कॉलनी परिसरात महिलांच्या खरेदीसाठी विशेष बाजार भरलाय, तर ट्रान्सपोर्ट नगर परिसरात भरलेल्या बाजारात सुका मेवा, शेवया, नान अशा खाद्य पदार्थांसह अत्तर, कपडे, विविधरंगी चष्मे घेण्यासाठी गर्दी उसळली आहे. जमील कॉलनी परिसरातील बाजारात विक्रीसाठी आलेल्या सुरमाची दुकाने लक्ष वेधणारी आहेत. या स्टॉलवर सुरमा बारीक कुटण्यासाठी ठेवण्यात आलेला खास चिनी मातीचा खलबत्ता पाहून प्रत्येक जण सुरमा खरेदीसाठी येतोय. हा सुरमा खास इजिप्तमधून आणला असल्याची माहिती सुरमा विक्रेते मोहम्मद सलमान यांनी दिली. इस्लाम धर्मात आनंदाच्या आणि शुभ पर्वावर डोळ्यात सुरमा लावण्याला महत्व आहे. डोळ्यात सुरमा लावल्याने डोळ्यातील उष्णता निघून जाते. आमच्याकडे इजिप्तमधून आणलेले हे खडक म्हणजे खरा सुरमा आहे. ३० रुपये तोळा अशी या सुरम्याची किंमत आहे, असे मोहम्मद सलमान यांनी सांगितले. अत्तर, गोल टोपी आणि कपडे खरेदीवर भर दिला जात असल्याचे बाजारात दिसून आले. विविध प्रकार आणि रंगाच्या अत्तराच्या लहान बाटल्या बाजारात अनेक ठिकाणी विक्रीसाठी आहेत. तसेच नान ब्रेड खरेदी करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सूर्योदयापूर्वी नानची ब्रेड दुधासोबत खाल्ली जाते. यामुळे नानची खरेदी मोठ्या प्रमाणात होते, अशी माहिती इम्रान खान यांनी दिली. तसेच रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा बनवण्यासाठी या शेवयांना मोठी मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. शेवटचा दिवस असल्याने दिवसभर बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. रात्रीही मोठी राहणार आहे. अनेकांनी रमजान ईदची संपूर्ण खरेदी केली. ईद निमित्त ट्रान्सपोर्ट नगर परिसरात यात्रा भरली होती. शिरखुर्मासाठी बाजारात सुका मेवा इम्पोर्टेड प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरी शिरखुर्मा बनवला जातो. शिरखुर्मा बनवण्यासाठी सर्व प्रकारचा सुकामेवा वापरला जातो. ट्रान्सपोर्टनगर परिसरात सुका मेव्याची अनेक दुकाने थाटलेली आहेत. बाजारातील खजूर हे मदिना शहरासह इराण आणि इराक या देशातून आयात केले आहे. तर काजू कॅलिफोर्निया आणि गोव्यातून आणला. अमेरिकेतील बदाम आम्ही अतिशय माफक दरात उपलब्ध करून देतो, असे सुकामेव्याचे व्यापारी मोहम्मद रिजवान यांनी सांगितले आहे.