एकच जिद्द शक्तिपीठ रद्द:शक्तिपीठ महामार्गाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी अधिकाऱ्यांना फिरावे लागले माघारी

एकच जिद्द शक्तिपीठ रद्द:शक्तिपीठ महामार्गाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी अधिकाऱ्यांना फिरावे लागले माघारी

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध होताना दिसत आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या महामार्गाला आपला विरोध कायम ठेवला आहे. महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्ह्यातील चाडगाव येथे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्या कंपनीला काम देण्यात आले आहे त्या कंपनीचे देखील कर्मचारी आले होते. यावेळी चाडगावसह येथील आजूबाजूच्या जवळपास 8 गावातील शेतकरी एकवटले होते. अधिकारी गावात आल्यावर या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा विरोध पाहता मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शक्तिपीठ महामार्ग समजला जातो. मात्र या महामार्गाला विरोध होताना दिसत आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यातील चडगाव, मोरवड, नांदगाव, सायगाव, भारज, भोकरंबा, दिघोळ देशमुख, रामेश्वर या गावातील शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार, कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुमारे 87 किलोमीटरच्या शक्तिपीठ मार्गासाठी सुमारे 850 हेक्टर पेक्षा जास्त जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने बाधित लोक एकत्रित येऊन विरोध करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर आणि औसा या एकूण पाच तालुक्यातून जाणार आहे. या पाचही तालुक्यतून सुमारे 35 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment