एकही कर्करोग संशयित महिला उपचारापासून वंचित राहता कामा नये:हिंगोली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या संजीवनी उपक्रमात एकही कर्करोगग्रस्त संशयित महिला औषधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी गुरुवारी ता 3 दिल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कर्करोगग्रस्त संशयित महिलांच्या तपासणी शिबिराच्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, डॉ मंगेश टेहरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. वसंत पाटील, डॉ. कुणाल अवचट यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश म्हणाले की महिलांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहाते. मात्र महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची दिसून येते ही बाब त्यांच्या कुटुंबासाठी निश्चितच योग्य नाही. अनेक वेळा मोठ्या आजाराने ग्रस्त झाल्यानंतर उपचारासाठी धावपळ केली जाते. यामध्ये मानसिक त्रासासोबतच आर्थिक त्रास देखील सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संजीवनी ही संकल्पना हाती घेतली. या उपक्रमात अशा कर्मचाऱ्यांमार्फत गाव पातळीवर प्रत्येक महिलांशी संवाद साधून त्यांची आरोग्य विषयक माहिती नोंदवण्यात आली. या उपक्रमात अशा कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांनी आशा कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. जिल्ह्यामध्ये आढळून आलेल्या संशयित कर्करोगग्रस्त महिलांची प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर आवश्यक तपासणी करावी. या तपासणीमध्ये कर्करोग्रस्त महिला आढळून आल्यास त्यांना तातडीने संदर्भसेवा द्यावी. त्यांचे औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत होतील तसेच एकही महिला उपचारापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. इतर तालुक्यांमध्ये ही या तपासण्या तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. महिलांनीही लहान मोठे आजार अंगावर न काढता तातडीने औषध उपचार घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळीआमदार तानाजी मुटकुळे यांनी मार्गदर्शन केले. संजीवनी उपक्रमात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच खाजगी स्त्री रोग तज्ञांची मदत घेऊन हा उपक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबवावा असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी लागणारे आवश्यक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांनी केले.