एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले?:आदित्य ठाकरे आकाशाकडे पहात म्हणाले, चंद्र दिसतोय का? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही मुख्यमंत्री पदाच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक त्यांच्या साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी निघून गेले. या संदर्भात सुरू असलेल्या घटना घडामोडीवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता याविषयी त्यांनी अधिक बोलणे टाळले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पहात चंद्र दिसतोय का? असे विचारले आणि ते हसत हसत निघून गेले. आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. महायुतीच्या सत्ता स्थापनेबद्दल बोलून काहीही फायदा नाही. आम्ही आमच्या कामाला लागलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे दरेगावला का गेले? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना यावर केवळ आकाशाकडे पाहत चंद्र दिसतोय का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. एकदा शिंदे यांना ज्यावेळी मोठा निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळी ते आपल्या मूळगाव असलेल्या दरेगावात जात असतात. असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे या ठिकाणी कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर किंवा गृहमंत्री पदावर अडून राहिले असल्याची चर्चा देखील राजकीय वातावरणात रंगली आहे. या चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे गावाकडे निघून गेल्याने याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. ‘दिव्य मराठी’ला भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पाच डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित म्हटले जात आहे. त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणता मोठा निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी दिलेला प्रतिक्रियेमुळे याची चर्चा आणखीनच रंगली आहे.