एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित दादांचा नंबर:‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’हे पद म्हणजे त्यांच्या खात्यात घुसखोरी; रोहित पवारांचा आरोप

एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित दादांचा नंबर:‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’हे पद म्हणजे त्यांच्या खात्यात घुसखोरी; रोहित पवारांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण केले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून त्यांची अजित पवार यांच्या अर्थ खात्यात घुसखोरी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या निर्णयावरून विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजित दादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजित दादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील. राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचे दुर्दैव म्हणावं लागेल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment