एकनाथ शिंदेंचा मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुखांनी एकाच वेळी शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या आभार दौरा काढला आहे. यानिमित्ताने नांदेड येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उद्धव ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम आणि वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या दोन्ही पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाची परभणी आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मोठी ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला हा मोठा झटका मानला जात आहे. पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक – उपमुख्यमंत्री शिंदे पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसैनिकांना जपा, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्हा आभार दौऱ्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिकेत देखील महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सदस्य नोंदणीवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.