एकनाथ शिंदेंची अर्थखात्याबाबत नाराजी:आमच्या फाईल्स मंजूर होत नसल्याची अमित शहांकडे तक्रार? पालकमंत्रिपदावरही केली चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले. मात्र, त्याआधी अमित शहा काल रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे अर्थखात्याबाबत तक्रार केल्याचे म्हटले जात आहे. आमच्या फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, अशी तक्रारही शिंदे यांनी अमित शहांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद द्यावे, अशी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची आग्रही मागणी आहे. तर आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे रायगडचे पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमित शहांसाठी खास कोकणी बेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रायगडावर छत्रपती शिवरायांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले. यानंतर त्यांनी सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजन केले. सुनीत तटकरे यांच्याकडून अमित शहांसाठी खास कोकणी बेत आखण्यात आला. अमित शहा हे शाकाहारी असल्याने त्यांच्यासाठी कोकणातील पारंपारिक पदार्थ तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अमित शाहांचा पाहुणचार करताना त्यांच्यासाठी स्पेशल हापुस आंब्याचा आमरस, उकडीचे मोदक, मिसळ पाव, साबुदाणा वडा असे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसाठी खास माश्यांचा आणि मटणाचा पाहुणचार होता, अशी माहिती मिळत आहे. सुनील तटकरे लेकीसाठी अमित शहांकडे शब्द टाकणार? दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी तटकरेंच्या रोह्यातील निवास्थानावरील भोजन महत्वाचे मानले जात आहे. विशेष म्हणजे रागडावरील कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच वाहनातून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. त्यामुळे या स्नेहभोजनावेळी सुनील तटकरे आपल्या मुलीच्या पालकमंत्रीपदासाठी अमित शहा यांच्याकडे शब्द टाकणार का? किंवा सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्यावर अमित शाह काय निर्णय घेणार? हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदेंची अर्थखात्याबाबत शहांकडे तक्रार दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे अर्थखात्याविषयी नाराजी दर्शवली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या फाईल्स अर्थ विभागाकडून लवकर मंजूर होत नसल्याची तक्रार शिंदे यांनी शहांकडे केली. तसेच शिवसेनेच्या फाईल्स अर्थ खात्याकडून वेळेवर मंजूर झाल्या पाहिजे, असा आग्रह शहांकडे धरला. यासोबतच रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा, अशी मागणी या भेटीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हे ही वाचा… शिवरायांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला:शिवबांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विचार जगभरात पोहचवा- अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले. त्यानंतर आज त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी त्यांचा उल्लेख शिवरायांच्या हातावर तुरी देणाऱ्या लोकांचे सरदार असा उल्लेख केला आहे. पूर्ण बातमी वाचा… अमित शहांची घसरली जीभ:औरंगजेबाच्या कबरीचा ‘समाधी’ म्हणून केला उल्लेख; ठाकरे गटाने तत्काळ ‘तडीपार’ म्हणत केला पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावर बोलताना मुघल बादशहा औरंगजेब याच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख समाधी म्हणून केला. त्यांच्या या ‘स्लिप ऑफ टंग’चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला. समाधी ही साधूसंत पुण्यवंतांची असते. त्यामु्ळे छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…