धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या:लाडक्या बहिणींबाबत केलेल्या विधानावरून निवडणूक विभागाची नोटीस
लाडक्या बहिणींना धमकावणे खासदार धनंजय महाडिक यांच्या अंगलट आले आहे. कोल्हापूर दक्षिण येथे एका प्रचार सभेत केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीत पाठवण्यात आली आहे. यामुळे धनंजय महाडिक यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दक्षिण येथे अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत धनंजय महाडिक यांनी भाषण देताना भारतीय न्यायसंहिता-2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक विभागाकडून त्यांना नोटीस पाठण्यात आली आहे. याबाबतचा खुलासा तत्काळ करावा, अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी पाठवली आहे. काय म्हणाले होते धनंजय महाडिक?
काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा थेट इशारा धनंजय महाडिक यांनी दिला होता. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ, पण असा दुगलेपणा इथून पुढे चालणार नाही. त्यामुळे आपण जागृत राहिले पाहिजे, असेही धनंजय महाडिक म्हणाले होते. विरोधकांनी टीका केल्यानंतर मागितली माफी
धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषत: वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो, असे महाडिक म्हणाले.