शिवसेना उमेदवार विजय शिवतारेंकडून आचारसंहितेचा भंग:त्यांच्यावर कारवाई करा, काँग्रेसचे रोहन सुरवसेंचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी शिवतारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन सुरवसे-पाटील यांनी दिली. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते. फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास राजकीय पक्षांना व उमेदवारांना प्रतिबंध आहे. विजय शिवतारे यांनी लावलेल्या एअर बलूनचे व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याचेही सुरवसे-पाटील यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षातील नेत्यांबाबत बोलताना तोंड सांभाळून आणि भान ठेवून बोलले पाहिजे. सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती चढली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी पातळी सोडून केलेली टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. महाराष्ट्राच्या जनतेला खोत यांची भाषा अजिबात आवडलेली नसून विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खोत यांना खडेबोल सुनावले असून, टीका करताना भान ठेवण्याचा इशारा दिला आहे.