जनशांती धामातील मंदिरांवर 175 सुवर्ण कलशांची स्थापना:बाणेश्वर महादेव मंदिरावर कलश; ज्योतिर्लिंग, चार धाम, साडेतीन शक्तिपीठ यांसह देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा
येथील जनशांती धाम येथे बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, साडेतीन शक्तीपीठ यांसह विविध देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गुरुवारी तेथील भगवान बाणेश्वराच्या मंदिरासह विविध मंदिरांवर शांतीगिरी महाराजांच्या हस्ते तब्बल १७५ सुवर्ण कलशांची स्थापना करण्यात आली. ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे आठवड्यापासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी याचनिमित्ताने जनशांती धामात बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, साडेतीन शक्तीपीठ यांसह विविध देवी देवतांची स्थापना करण्यात आली. येथील श्री बाणेश्वर महादेव मंदिरावर शांतीगिरि महाराज यांच्या हस्ते सुवर्ण कलश बसविण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषित हा दिव्य सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झाला. पहाटे नित्य विधी, आरती, प्रवचन, सत्संग झाला. सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर हजारो भाविकांच्या साक्षीने ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्र घोषात भाविकांनी नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत ‘जय बाबाजी, जय बाणेश्वर’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी हजारो भाविकांनी जनशांती धाम येथे गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळी महाप्रसाद व घरी घेऊन जाण्यासाठी बुंदी, चिवडा प्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.