कारखान्यांची धुराडी पेटली, ऊसतोड कामगार निवडणुकीच्या प्रचारात दंग:श्रीगोंद्यातील कारखान्याचे हंगाम सुरू, मजूर आणताना मुकादमांची दमछाक

कारखान्यांची धुराडी पेटली, ऊसतोड कामगार निवडणुकीच्या प्रचारात दंग:श्रीगोंद्यातील कारखान्याचे हंगाम सुरू, मजूर आणताना मुकादमांची दमछाक

हिवाळ्याला सुरुवात होत असताना, तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटू लागली आहेत. दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आपला गाव सोडून कारखान्याच्या दिशेने निघतात. त्यासाठी जुलै, ऑगस्टमध्येच मुकादमांनी ऊसतोड कामगारांसोबत करार केलेले असतात. दसरा, दिवाळीला उचल घेतली जाते. मात्र, अनेकदा परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी जाण्यास अनेक कामगार टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांना कामावर आणताना मुकादमांच्या नाकीनऊ येते. यंदा कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याच्या काळातच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवारांच्या प्रचारात अनेक ऊसतोड कामगार गुंतले आहेत. त्यामुळे हे कामगार कामावर आणणे मुकादमांसमोर मोठे आ‌व्हान असणार आहे. सध्या तरी काही प्रमाणात कामगार मजल दरमजल करीत कारखान्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र श्रीगोंदे तालुक्यात पाहावयास मिळते आहे. सर्वत्र साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. कारखान्यांनी मुकादमाद्वारे ऊसतोड कामगारांच्या टोळीप्रमुखांना आगावू रकमांचे वाटप केले आहे. यंदा परतीच्या पावसाने जेरीस आणल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा पोटमारा झाला. तूर्तास गावाकडे काहीच रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक जण ऊसतोड कामावर निघाले आहेत. दरवर्षी शेतमजूर कारखान्यांशी करार करून ऊसतोडीला जात. मात्र, यंदा उचल घेऊनही कामावर जाण्यासाठी ऊसतोड कामगार तोंड लपवत असल्याचे चित्र दिसते. काही जण टोळीप्रमुखांच्या घरासमोरच ठिय्या मांडून बसल्याने टोळीप्रमुख भूमिगत झाल्याचे दिसत आहे. काही मजुरांनी मुकादम टोळीप्रमुखास चकवा देऊन गाडी येण्यापूर्वीच परगावी पोबारा केल्याचेही समजते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा घुगलवडगाव, भानगाव देऊळगाव, अजनुज, पेडगाव, काष्टी, सांगवी, तसेच नदीपट्ट्यातील सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असल्याचे दिसते. ऊसतोडीला निघताना सोबतीला भांडीकुंडी, खोपटाचे साहित्य, बैलगाडी, शेळ्या, चिमुरडी मुले आदी सोबत नेले जाते. मुकादमाने दिलेली उचल फेडण्यासाठी पाच-सहा महिने उसाच्या फडात मेहनत करावी लागते. ऊस तोडीला आलेल्या कामगारांचे सणवार उसाच्या फडावरच साजरे होतात. या काळात मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होते. कामगारांना उचल देऊन मुकादम आले संकटात मुकादम राजू नेमराज जाधव (रा. सातगाव तांडा, ता. पाचोरा, जळगाव) म्हणाले, की कारखान्यांकडून ॲडव्हान्स घेण्यासाठी मजुरांची दोन महिन्यांपासून धावपळ सुरू आहे. बहुतांश कामगार करार करून पैसे उकळतात अन् नंतर पसार होतात. त्यामुळे कारखान्यांचा मुकादमावरील व मुकादमांचा मजुरांवरील विश्वास उडत चालला आहे. काही ठिकाणी मजूर वर्ग आम्हाला चकवा देत असल्याने ऊसवाहतूक ट्रॅक्टरमालक उचल देऊन अडचणीत सापडले आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment